(संगमेश्वर / एजाज पटेल)
संगमेश्वर शहरातील गजबजलेल्या बाजारपेठेत रात्रीच्या सुमारास बिबट्या भक्ष्य शोधार्थ सैरावैरा भटकंती करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून, यामुळे नागरिकांमध्ये तीव्र भीतीचे वातावरण पसरले आहे. या घटनेचे थरारक दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाले असून, संबंधित व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
मध्यरात्रीनंतर बिबट्या बाजारपेठेतील बंद दुकानांच्या समोरून, रस्त्यावरून अगदी निर्धास्तपणे फिरताना दिसत आहे. काही क्षण तो थांबून आजूबाजूला पाहत असल्याचेही दृश्य सीसीटीव्हीत नोंदले गेले आहे. दिवसा गजबजलेली असणारी बाजारपेठ रात्री बिबट्याच्या संचारामुळे भयावह बनली आहे.
या घटनेनंतर व्यापारी, भाजी विक्रेते तसेच परिसरातील नागरिकांमध्ये मोठी दहशत निर्माण झाली आहे. सकाळच्या वेळेस लवकर बाजारात येणाऱ्या नागरिकांमध्येही भीतीचे वातावरण असून, लहान मुले, वृद्ध नागरिक व महिला यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
वनविभागाने बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावण्याची व गस्त वाढवण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे. प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अन्यथा मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही, असा इशाराही स्थानिकांकडून देण्यात येत आहे
संगमेश्वर बाजारपेठेत बिबट्याचा मुक्त संचार ही घटना केवळ धक्कादायक नाही, तर प्रशासनासाठीही गंभीर इशारा मानली जात आहे

