( पुणे )
पुण्यातील कात्रज परिसरात आईनेच आपल्या दोन अल्पवयीन मुलांकडे सातत्याने दुर्लक्ष करून त्यांना मारहाण, शिवीगाळ आणि धमक्या दिल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम 2015 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी कात्रज येथील माऊली नगर परिसरातील आर्चिड रेसिडन्सीमध्ये राहणाऱ्या 35 वर्षीय व्यक्तीने तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी या तक्रारीवरून 33 वर्षीय महिलेविरोधात गुन्हा दाखल केला असून, ही महिला सध्या इंदापूर तालुक्यातील भिगवण येथे वास्तव्यास असल्याची माहिती आहे.
मुलांच्या जन्मापासूनच दुर्लक्ष केल्याचा आरोप
फिर्यादीनुसार, विवाहानंतर पती-पत्नी एकत्र राहत असताना त्यांना दोन मुले झाली. मात्र आरोपी महिलेने आई आणि पालक म्हणून असलेली जबाबदारी पार पाडली नाही. मुलांच्या जन्मापासूनच त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे, वारंवार मारहाण करणे, शिवीगाळ आणि धमक्या देणे, तसेच मुले आजारी किंवा जखमी झाल्यानंतरही त्यांना उपचारासाठी दवाखान्यात न नेणे, असे गंभीर आरोप तक्रारीत नमूद करण्यात आले आहेत.
याशिवाय मुलांच्या योग्य पालनपोषणात कसूर केल्याचाही आरोप करण्यात आला आहे. हा प्रकार गेल्या सहा महिन्यांपासून ते 9 डिसेंबर 2025 या कालावधीत घडल्याचे तक्रारीत नमूद असून, या प्रकरणी 1 फेब्रुवारी 2026 रोजी अधिकृतपणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बालकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून, पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, बालकांच्या संरक्षणाबाबत पुन्हा एकदा चिंता व्यक्त केली जात आहे.

