( सातारा )
सातारा शहरातील एका नामांकित इंग्रजी माध्यमाच्या शाळेच्या हॉस्टेलमध्ये विद्यार्थ्यांच्या छळाचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हॉस्टेलमधील केअरटेकरकडून तब्बल 24 विद्यार्थ्यांचा लैंगिक आणि मानसिक छळ झाल्याची बाब उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी ऋषिकेश सुभाष चव्हाण याला अटक केली होती. मात्र न्यायालयाने त्याला अटी-शर्थीसह जामीन मंजूर केल्याची माहिती सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी दिली.
पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल
सातारा पोलिसांच्या माहितीनुसार, इंग्रजी माध्यमाच्या एका नामांकित शाळेतील तीन विद्यार्थ्यांवर प्रथम अत्याचाराचा प्रयत्न झाल्याची बाब समोर आली. यानंतर शाळा प्रशासनातील अधिकाऱ्याने दिलेल्या तक्रारीवरून संबंधित केअरटेकरविरोधात पॉक्सो (POCSO) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीला अटक केल्यानंतर पोलिसांनी कसून चौकशी केली असता, त्याने आणखी अनेक विद्यार्थ्यांचा छळ केल्याचे उघड झाले. तपासात आरोपी मुलांच्या शरीराला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करणे, मारहाण करणे, पैशांची मागणी करणे तसेच धमक्या देणे अशा प्रकारचे कृत्य करत असल्याचे समोर आले.
चौकशीत 24 विद्यार्थ्यांचा छळ उघड
शाळा व्यवस्थापनाने केलेल्या अंतर्गत चौकशीत आरोपी केअरटेकरने एकूण 24 विद्यार्थ्यांबाबत घृणास्पद कृत्य केल्याचे स्पष्ट झाले. गेल्या काही दिवसांपासून हा प्रकार सुरू असल्याचेही पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. शाळेमध्येही विद्यार्थ्यांवर अत्याचाराचा प्रयत्न झाल्यामुळे सातारा शहरात मोठी खळबळ उडाली आहे.
मुलांनी पालकांना सांगितल्याने प्रकार उघड
या घटनेतील काही विद्यार्थ्यांनी आपल्यावर झालेल्या प्रकाराबाबत पालक आणि शिक्षकांना माहिती दिल्यानंतर संपूर्ण प्रकरण समोर आले. त्यानंतर शाळा व्यवस्थापनाने तत्काळ सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीनुसार, आरोपीने तीन विद्यार्थ्यांचे चार ते पाच वेळा लैंगिक शोषण केले. तसेच हा प्रकार बाहेर सांगू नये म्हणून मुलांना मारहाण करून धमकावल्याचेही सांगण्यात आले आहे. मुलांचे हात पिरगळणे आणि डोके आपटणे अशा प्रकारे मारहाण केल्याचाही आरोप आहे. हा प्रकार 25 जानेवारी ते 15 फेब्रुवारी तसेच 7 मार्च 2026 या कालावधीत घडल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
पोलिसांनी आरोपीला अटक करून सुट्टीकालीन न्यायालयात हजर केले. सुनावणीनंतर न्यायालयाने आरोपीला अटी-शर्थीसह जामीन मंजूर केला असल्याची माहिती पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी दिली.
नामांकित शाळेतच असा गंभीर प्रकार घडल्यामुळे पालकांमध्ये मोठी चिंता व्यक्त केली जात आहे. दिवसेंदिवस विद्यार्थ्यांवरील अत्याचाराच्या घटना वाढत असल्यामुळे शाळा व्यवस्थापनाने हॉस्टेल सुरक्षा आणि देखरेखीसाठी कठोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी पालकांकडून होत आहे. दरम्यान, या प्रकरणात एकूण 24 विद्यार्थ्यांच्या तक्रारी प्राप्त झाल्या असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलीस प्रशासनाने दिली आहे.

