(संगमेश्वर / एजाज पटेल)
संगमेश्वर तालुक्यातील तूरळ हरेकरवाडी स्मशानभूमी समोर मुंबई -गोवा राष्ट्रीय महामार्गावर दोन दुचाकीचा अपघातात झाला. या अपघातात दोन्ही दुचाकीस्वार तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी रात्री 8.30 च्या सुमारास घडली. अपघातात मृत्यू झालेल्या दोन्ही तरुणांच्या कुटूंबायांवर ऐन शिमगोत्सावात दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मृत्यू झालेला एक तरुण तुरळ येथील तर दुसरा धामापूर येथील असून या दोन्ही गावांवर शोककळा पसरली आहे.
सूरज राजाराम फडकले (वय वर्ष 28, रा. तुरळ, हरेकरवाडी) हा आपल्या ताब्यातील होंडा युनिकॉर्न दुचाकी MH-08/AM/6964 घेऊन तुरळ येथून आरवलीकडे जात होता, तर संदेश सखाराम भोजने (वय वर्ष 40, रा. धामापूर ओसेवाडी) हा आपल्या ताब्यातील ज्यूपीटर दुचाकी नंबर MH08/BA/7162 घेऊन आरवली येथून तुरळ येथे जात असताना मुंबई -गोवा राष्ट्रीय महामार्गावरील तुरळ हरेकरवाडी स्मशानभूमी समोर दोन्ही दुचाकी समोरासमोर एकदुसऱ्यावर जोरात धडकून अपघातात घडला.
दोन दुचाकी समोरासमोर एक दुसऱ्यावर धडकून झालेल्या भीषण अपघातात ज्युपिटर दुचाकी चालक संदेश सखाराम भोजने याचा अपघातस्थळीच मृत्यू झाला, तर युनिकोर्न दुचाकी चालक सूरज राजाराम फडकले याचा संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात मृत्यू झाल्याची माहिती संगमेश्वर पोलिसांनी दिली.
अपघाताची माहिती मिळताच संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस उपअधीक्षक शिवप्रसाद पारवे, पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत कांबळे, पोलीस उपनिरीक्षक प्रशांत शिंदे, पोलीस उपनिरीक्षक विवेक साळवी, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शांताराम पंदेरे, पोलीस हेड कॉन्स्टेबल सचिन कामेरकर, पोलीस हेडकॉन्सटेबल बरगाळे यांनी अपघातस्थळी पोहचून पंचनामा केला.
अपघाताची घटना कळताच संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात दोन्ही मृत तरुणांचे नातेवाईक तसेच गावातील लोकांची गर्दी झाली होती. या दोन तरुणांच्या निधनामुळे हळहळ व्यक्त केली जात होती. अपघाताचा गुन्हा पोलिसांनी दाखल केला असून शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देणार असल्याचे पोलिसांनी रात्री सांगितले.