(राजापूर / तुषार पाचलकर)
श्रीराम सेवक मंडळ, पाचल आणि राजापूर पूर्व विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त शिवजन्मोत्सव सोहळा २०२६ चे भव्य आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा बुधवार, दि. १८ फेब्रुवारी आणि गुरुवार, दि. १९ फेब्रुवारी २०२६ रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौक, पाचल येथे मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे.
या दोन दिवसीय शिवजन्मोत्सवात प्रतिमा पूजन, वक्तृत्व स्पर्धा, दुर्गादौड, किल्ला बनविणे स्पर्धा (पाचल गाव मर्यादित – एक शाळा, एक किल्ला), भव्य बाईक रॅली, कीर्तन–पोवाडा तसेच पारंपरिक पद्धतीने शिवजयंती सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
वक्तृत्व स्पर्धेचे विषय पुढीलप्रमाणे असतील :
• गट १ ते ७ – “मी किल्ला बोलतोय…”
• गट ८ ते १५ – “महाराजांच्या मोहिमा आणि गनिमी कावा”
या स्पर्धांद्वारे विद्यार्थ्यांची विचारशक्ती विकसित करणे आणि शिवचरित्राची सखोल ओळख करून देणे हा मुख्य उद्देश आहे.
विशेष आकर्षण म्हणून प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. श्री काशीनाथ महाराज माने यांचे कीर्तन–पोवाडा आयोजित करण्यात आले असून, त्यातून शिवरायांचे शौर्य, स्वराज्याची संकल्पना आणि मराठी संस्कृतीचा गौरव प्रभावीपणे मांडला जाणार आहे.
या उपक्रमाच्या माध्यमातून तरुण पिढीमध्ये इतिहासाबद्दल अभिमान निर्माण करणे, शिवचरित्राची जाणीव वाढवणे आणि “चला जपू संस्कृती, घडवू मराठी बाणा” हा संदेश समाजापर्यंत पोहोचवणे, असा आयोजकांचा संकल्प आहे.
या शिवजन्मोत्सव सोहळ्यास नागरिकांनी, शिवप्रेमींनी, विद्यार्थीवर्गाने आणि तरुणांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

