(राजापूर)
आजीवली बौद्ध विकास मंडळ मुंबई/ग्रामीण आणि माता रमाई महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने, तसेच आयोजक खतरनाक क्रिकेट क्लब यांच्या पुढाकारातून दि. २४ ते २६ जानेवारी दरम्यान आजीवली येथे पर्व ५ ही भव्य क्रिकेट स्पर्धा यशस्वीरीत्या पार पडली.
तीन दिवस चाललेल्या या स्पर्धेत एकूण २४ संघांनी सहभाग घेतला. मुंबई, कोल्हापूर, संगमेश्वर, कुडाळ, गगनबावडा, वैभववाडी आणि कणकवली आदी ठिकाणांहून आलेल्या संघांनी आजीवलीत आपले कौशल्य सादर केले.
अंतिम फेरीत भगवती आंब्रड (कुडाळ) संघाने विजेतेपद पटकावले. बाप्पा मोरया (मुंबई) संघ उपविजेता ठरला, तर गांगो रवळनाथ (तिरवडे) संघाने तृतीय क्रमांकाचा मान पटकावला. या तिन्ही संघांचे आयोजकांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. तसेच स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व संघांचे सहकार्याबद्दल आभार मानण्यात आले.
या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी ग्रामीण मंडळ, माता रमाई महिला मंडळ, वाडीतील तरुण, तसेच मुंबईहून उपस्थित असलेल्या माजी कार्यकर्त्यांचे मोलाचे योगदान लाभले. सर्व सहकार्यकर्त्यांचे आयोजकांनी मनापासून आभार व्यक्त केले.
बक्षीस वितरण आणि समारोप कार्यक्रमासाठी विशेष उपस्थिती लाभली ती आमदार किरण भैय्या सामंत यांच्या सुकन्या अपूर्वा ताई सामंत यांची. त्यांनी युवकांना क्रिकेटच्या माध्यमातून सकारात्मक वाटचाल करण्याचा संदेश देत मोलाचे मार्गदर्शन केले व विजेत्या संघांना शुभेच्छा दिल्या. त्यांच्या हस्ते बक्षीस वितरण करून स्पर्धेचा सांगता समारोप करण्यात आला.

