(जैतापूर / वार्ताहर)
पोलीस दलातील आव्हानात्मक सेवा, आंदोलने कौशल्याने हाताळण्याची क्षमता आणि गुन्ह्यांच्या तपासातील उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत लांजा उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश कदम यांना उल्लेखनीय सेवेबद्दल राष्ट्रपती पोलीस पदक प्रदान करण्यात आले. मुंबईतील मलबार हिल येथील दरबार हॉलमध्ये आयोजित समारंभात राज्यपाल श्री. विष्णु देव वर्मा यांच्या हस्ते त्यांना या पदकाने सन्मानित करण्यात आले. त्यांच्या या यशस्वी वाटचालीत वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन, प्रोत्साहन आणि त्यांनी दाखविलेला विश्वास महत्त्वाचा ठरला आहे.
सुरेश कदम यांची १९९५ मध्ये पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झाली. त्यानंतर त्यांनी मुंबई, कोल्हापूर, गोंदिया, ठाणे, पालघर, पुणे आणि रत्नागिरी येथे विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या. रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात कार्यरत असताना तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सुरेश भालेकर यांच्या शिफारशीनुसार फेब्रुवारी २००८ मध्ये तत्कालीन पोलीस अधीक्षक फत्तेसिंग पाटील आणि अपर पोलीस अधीक्षक सुरेश मेंगडे यांनी त्यांच्यावर विश्वास दाखवत जयगड पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारीपदाची जबाबदारी सोपवली.
जयगड येथे कार्यरत असताना JSW प्रकल्प आणि आंग्रे पोर्टच्या उभारणीदरम्यान निर्माण झालेली आंदोलने त्यांनी शांततेने हाताळली. तसेच JSW कॉलनीतील बॉम्बस्फोटाच्या गुन्ह्याचा यशस्वी तपास केला. या अनुभवाच्या आधारे पुढे त्यांच्यावर नाटे पोलीस ठाण्याची जबाबदारी सोपविण्यात आली.
जैतापूर आंदोलनानंतर नाटे पोलीस ठाण्याच्या परिसरात निर्माण झालेला तणाव निवळण्यासाठी तत्कालीन पोलीस अधीक्षक श्री. दीपक पांडे यांनी कदम यांच्या जयगडमधील अनुभवाचा विचार करून त्यांच्याकडे ही जबाबदारी दिली. नाटे येथेही त्यांनी परिस्थिती हाताळत पोलिसांबद्दलचा जनतेचा विश्वास पुन्हा संपादन केला.
रत्नागिरी ग्रामीणचे पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत असताना २०१८ मधील गँगवॉर आणि उद्योजक दीपक गद्रे यांच्याशी संबंधित खंडणी प्रकरणाच्या तपासात त्यांनी धैर्याने काम केले. यापूर्वी गोंदियासारख्या नक्षलग्रस्त भागात बजावलेल्या सेवेबद्दल त्यांना महासंचालक सन्मानचिन्ह आणि विशेष सेवा पदकानेही गौरविण्यात आले होते.
ऑगस्ट २०२५ मध्ये पोलीस उपअधीक्षकपदी बढती मिळाल्यानंतर लांजा येथे कार्यरत असताना त्यांनी केतकर ज्वेलर्स अपहरण प्रकरण आणि आंबा घाटातील दरोडा उघडकीस आणला. विविध ठिकाणी आव्हानात्मक परिस्थितीत बजावलेली सेवा, आंदोलने हाताळण्यातील कौशल्य आणि गुन्हे तपासातील कामगिरी यांची दखल घेत त्यांना राष्ट्रपती पोलीस पदकाने सन्मानित करण्यात आले.
छायाचित्र : मलबार हिल येथील राजभवनाच्या दरबार हॉलमध्ये आयोजित पदक अलंकरण समारंभात लांजाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश कदम यांना उल्लेखनीय सेवेबद्दल राष्ट्रपती पोलीस पदक प्रदान करताना राज्यपाल श्री. विष्णु देव वर्मा.


