(रत्नागिरी / प्रतिनिधी)
वातावरणातील सततच्या बदलांमुळे रत्नागिरी जिल्ह्यातील मासेमारी व्यवसायावर संकटाचे गडद सावट पसरले आहे. गेले जवळपास महिनाभर मच्छीमारांच्या जाळ्यात मासळीऐवजी तोटाच अडकत असून, नौका रिकाम्याच किनाऱ्यावर परत येण्याचे प्रमाण वाढले आहे. पौर्णिमेच्या चांदण्यामुळे मासळी स्थलांतरित झाल्याने आधीच मासेमारी मंदावली होती; त्यातच आता समुद्रातील जोरदार वाऱ्यांमुळे मच्छीमारांना समुद्रात उतरणेही धोकादायक ठरत आहे.
पौर्णिमेच्या आधी व नंतर काही दिवस मासळी स्थलांतरित होते. या काळात मासळीच्या शोधासाठी मच्छीमारांना अधिक अंतर कापावे लागते. परिणामी डिझेलचा खर्च वाढतो, मात्र मासळी मिळण्याची शक्यता अत्यंत कमी राहते. ही अडचण निवळण्याआधीच समुद्रात अचानक जोरदार वारे सुरू झाले. अशा परिस्थितीत मासेमारीसाठी गेलेल्या नौकांवरील जाळी वाऱ्यामुळे गुरफटून फाटण्याचे प्रकार वाढले आहेत.
फाटलेल्या जाळ्यांची दुरुस्ती महागडी ठरत असल्याने अनेक मच्छीमार अर्ध्यावरूनच मासेमारी थांबवून परत येत आहेत. काहींनी तर संभाव्य नुकसान टाळण्यासाठी मासेमारीला न जाण्याचाच निर्णय घेतला आहे. परिणामी किनाऱ्यावर नौकांची रांग लागलेली दिसत असून, समुद्रकिनाऱ्यावरील हालचाली लक्षणीयरीत्या कमी झाल्या आहेत.
नौकांचे इंधन, खलाशांचे पगार, रेशन, बर्फ तसेच इतर खर्च भागेल इतकीही मासळी हाती लागत नसल्याने मच्छीमारांची आर्थिक कोंडी तीव्र झाली आहे. मासेमारीवर अवलंबून असलेले बर्फ कारखाने, वाहतूक, विक्रेते आदी जोडधंदेही या संकटाच्या जाळ्यात अडकले आहेत. एकूणच बदलत्या वातावरणामुळे रत्नागिरीतील मासेमारी व्यवसाय सध्या अत्यंत बिकट अवस्थेत सापडला असून, मच्छीमार वर्ग चिंतेत आहे.

