(खेड / रत्नागिरी)
‘सावधान… पुढे धोका आहे!’ असा वारंवार इशारा देणाऱ्या वॉचमनचे ऐकले असते, तर रविवारी खेड तालुक्यात घडलेला अंगावर शहारे आणणारा प्रसंग कदाचित टळला असता. मात्र, पुराच्या पाण्याचा धोका कमी लेखण्याची चूक एका कारचालकाला चांगलीच महागात पडली. पुलावरून वेगाने वाहणाऱ्या पुराच्या पाण्यात कार घातल्याने वाहनासह तिघेजण प्रवाहात वाहून गेले. सुदैवाने नदीकाठच्या एका झाडाचा आधार मिळाल्याने त्यांचे प्राण वाचले, तर स्थानिक ग्रामस्थांच्या धाडसी आणि तत्पर बचावकार्यातून तिघांनाही सुखरूप बाहेर काढण्यात यश आले.
ही थरारक घटना रविवारी सकाळी खेडजवळील जामगे येथील सैनिक स्कूल परिसरातील छोट्या पुलावर घडली. गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पुलावरून मोठ्या प्रमाणात पुराचे पाणी वाहत होते. त्यामुळे परिसरात धोकादायक परिस्थिती निर्माण झाली होती. रविवारी सकाळी सुमारे अकराच्या सुमारास सैनिक स्कूलमधून लाल रंगाची कार बाहेर पडली. कारमध्ये एक महिला आणि दोन पुरुष प्रवास करत होते. पुलावरील पाण्याचा वेग आणि संभाव्य धोका लक्षात घेऊन प्रवेशद्वारावरील वॉचमनने चालकाला स्पष्ट शब्दांत पुढे न जाण्याचा इशारा दिला. मात्र, चालकाने तो धोक्याचा इशारा दुर्लक्षित करत कार थेट पुलावरील पुराच्या पाण्यात उतरवली.
क्षणातच पाण्याच्या प्रचंड प्रवाहाने कारवरील चालकाचे नियंत्रण सुटले आणि वाहन प्रवाहासोबत वाहू लागले. काही अंतरावर जाऊन कार पुलाच्या रेलिंगला अडकली. परिस्थिती हाताबाहेर गेल्याचे लक्षात येताच कारमधील तिघांनी जीव वाचवण्यासाठी बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. मात्र, वाहनातून बाहेर पडताच ते तिघेही पुराच्या वेगवान प्रवाहात वाहून गेले. हा संपूर्ण थरार पाहण्यासाठी नदीच्या दोन्ही तीरांवर नागरिकांची मोठी गर्दी जमली होती. पाण्याच्या प्रचंड लोटात वाहत असतानाच सुदैवाने नदीकाठच्या एका झाडाच्या फांद्या त्यांच्या हाती लागल्या. त्या झाडाला घट्ट पकडून त्यांनी मृत्यूशी अक्षरशः झुंज दिली.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी कोणतीही वेळ न दवडता धाडसी बचावमोहीम हाती घेतली. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्यांनी दोरखंड आणि उपलब्ध साधनांच्या साहाय्याने तिघांनाही सुरक्षित बाहेर काढले. ग्रामस्थांच्या प्रसंगावधानामुळे आणि वेळीच केलेल्या मदतीमुळे मोठी जीवितहानी टळली. या घटनेने पुन्हा एकदा पूरस्थितीत प्रशासनाच्या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष करणे किती धोकादायक ठरू शकते, याची जाणीव करून दिली आहे. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर पुलांवरून वाहणाऱ्या पाण्यातून वाहन नेण्याचा मोह टाळावा, असे आवाहन प्रशासनाकडून वारंवार करण्यात येत असतानाही काही वाहनचालकांचा बेफिकीरपणा जीवावर बेतू शकतो, हे जामगे येथील या थरारक घटनेने अधोरेखित केले.

