(रत्नागिरी / प्रतिनिधी)
शहरातील घरफोड्यांचे सत्र काही थांबण्याचे नाव घेत नाही. सलग तिसऱ्या रात्री चोरट्यांनी पुन्हा एकदा शहरात डल्ला मारत नुतननगर परिसरातील घर फोडून सुमारे ६५ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. या घटनेने नागरिकांमध्ये पुन्हा एकदा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
शहरातील अभ्युदयनगरजवळील नुतननगर भागात शुक्रवारी पहाटे तीनच्या सुमारास ही घरफोडी घडली. सायली झगडे (वय ५०, रा. नुतननगर, रत्नागिरी) यांनी याबाबत शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, अज्ञात चोरट्याने गुरुवारी पहाटे त्यांच्या घराच्या मुख्य दरवाजाचे लॅच तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर बेडरूममधील कपाटाचे ड्रॉव्हर उचकटून त्यातील सोन्याचे कानातले आणि ५० हजार रुपये रोख असा एकूण ६५ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. सकाळी झगडे या घराच्या वरच्या मजल्यावरून खाली आल्यावर बेडरूममधील वस्तू अस्ताव्यस्त पडलेल्या दिसल्या. चोरी झाल्याचे लक्षात येताच त्यांनी तात्काळ शहर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली. याप्रकरणी गुन्हे प्रकटीकरण विभागाचे सहाय्यक पोलिस फौजदार दीपक साळवी तपास करत आहेत.
गेल्या काही दिवसांपासून रत्नागिरी शहरात घरफोड्यांची मालिकाच सुरू आहे. काही दिवसांपूर्वी छत्रपतीनगर परिसरातील बंद बंगल्याची रेकी करून चोरट्यांनी तेथे घरफोडी केली होती. या घटनेत सुमारे १५ तोळे सोन्याचे दागिने आणि ४० हजार रुपये रोख असा मुद्देमाल चोरीला गेला होता. त्यानंतर सलग दुसऱ्या दिवशी साईनगर येथे तिन्ही बंद घरे फोडण्यात आली, मात्र त्यातून मौल्यवान वस्तू चोरीला गेली नाही.
दरम्यान, शहर पोलिसांनी चोरट्यांचा शोध घेण्यासाठी मोहीम हाती घेतली असून साळवी स्टॉप, नाचणे आणि मारुती मंदिर परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. सीसीटीव्हीच्या आधारे लवकरच संशयितांच्या मुसक्या आवळल्या जातील, असा विश्वास शहर पोलिस निरीक्षक विवेक पाटील यांनी व्यक्त केला आहे.

