(राजापूर / तुषार पाचलकर)
राजापूर तालुक्यात अप्पर तहसीलदार कार्यालयाचे मुख्यालय निश्चित करताना विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित, पालकांची सोय तसेच पंचक्रोशीच्या सर्वांगीण विकासाचा विचार करून ते पाचल येथेच स्थापन करण्यात यावे, अशी मागणी पाचल पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे सहसचिव, शैक्षणिक संस्थेचे सदस्य तथा पाचलचे माजी उपसरपंच किशोर नारकर यांनी शासनाकडे केली आहे.
किशोर नारकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पाचल हे राजापूरच्या पूर्व विभागातील महत्त्वाचे शैक्षणिक केंद्र असून गेल्या अनेक वर्षांपासून परिसरातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाचे प्रमुख ठिकाण म्हणून ओळखले जाते. येथे माध्यमिक विद्यालय, कनिष्ठ महाविद्यालय, बी.कॉम. महाविद्यालय, एमकेसीएल (MKCL), एमएस-सीआयटी (MS-CIT), एमएसीआयटी (MACIT) तसेच विविध व्यावसायिक आणि कौशल्य विकास अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. त्यामुळे पंचक्रोशीतील अनेक गावांमधील विद्यार्थी दररोज शिक्षणासाठी पाचलमध्ये ये-जा करतात.
पाचल हे दहावी (SSC) आणि बारावी (HSC) बोर्ड परीक्षांचे अधिकृत परीक्षा केंद्र असल्याने दरवर्षी शेकडो विद्यार्थी येथे परीक्षा देण्यासाठी येतात. विविध शैक्षणिक उपक्रम, परीक्षा आणि शासकीय प्रक्रियांचे केंद्र म्हणूनही पाचलने स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.
नारकर यांनी पुढे सांगितले की, प्रवेश प्रक्रिया, शिष्यवृत्ती, जात, उत्पन्न, रहिवासी, अधिवास, नॉन-क्रीमी लेयर प्रमाणपत्र, ई-सेवा तसेच इतर शासकीय दाखल्यांसाठी विद्यार्थ्यांना आणि पालकांना वारंवार महसूल प्रशासनाशी संबंधित कार्यालयांमध्ये जावे लागते. अप्पर तहसीलदार कार्यालय पाचलमध्ये स्थापन झाल्यास ही सर्व कामे शिक्षणासोबतच एकाच ठिकाणी सहज पूर्ण होतील. त्यामुळे विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांचा वेळ, पैसा आणि श्रम यांची मोठ्या प्रमाणात बचत होईल.
पाचलमध्ये स्टेशनरी दुकाने, पुस्तक विक्रेते, बँका, पोस्ट कार्यालय, ई-सेवा केंद्रे, संगणक प्रशिक्षण संस्था, एसटी बसस्थानक तसेच रिक्षा आणि खासगी वाहतुकीच्या सुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळे शैक्षणिक आणि प्रशासकीय कामांसाठी आवश्यक असलेल्या सर्व सुविधा विद्यार्थ्यांना एकाच ठिकाणी मिळू शकतात, असेही त्यांनी नमूद केले.
अप्पर तहसीलदार कार्यालयाचे मुख्यालय निश्चित करताना केवळ भौगोलिक स्थान न पाहता त्या ठिकाणची शैक्षणिक, सामाजिक आणि प्रशासकीय क्षमता विचारात घेणे आवश्यक आहे. पाचलने अनेक वर्षांपासून पंचक्रोशीचे शैक्षणिक केंद्र म्हणून प्रभावी भूमिका बजावली असून भविष्यातही ती अधिक सक्षमपणे पार पाडण्याची क्षमता या गावात आहे, असे नारकर यांनी म्हटले.
“अप्पर तहसीलदार कार्यालय पाचलमध्ये स्थापन झाल्यास त्याचा सर्वाधिक लाभ विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि पंचक्रोशीतील सर्वसामान्य नागरिकांना होईल. त्यामुळे शासनाने विद्यार्थ्यांचे भविष्य, उपलब्ध पायाभूत सुविधा आणि जनसुविधांचा विचार करून अप्पर तहसीलदार कार्यालयाचे मुख्यालय पाचल येथेच स्थापन करावे,” असे आवाहन किशोर नारकर यांनी शासनाकडे केले आहे.

