(चिपळूण)
गुहागर-चिपळूण मार्गावरील बायपास रस्त्यावर लाइफ केअर हॉस्पिटल शेजारील एका भंगार गोडावूनला आग लागल्याची घटना सोमवारी दुपारी घडली. या आगीने काही क्षणातच रौद्ररूप धारण केल्याने अनेकांची धावपळ उडाली. नगरपरिषदेसह लोटे औद्योगिक वसाहतीच्या अग्निशमक बंबाच्या साहाय्याने आग ओटाक्यात आणण्यात आली. या आगीत लाखोंचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.
गुहागर-चिपळूण बायपास रस्त्यालगत भानुशाली यांचे भंगाराचे गोडावून आहे. लोटे औद्योगिक वसाहतीसह आजूबाजूच्या परिसरातील औद्योगिक वसाहतीमधील भंगाराचे साहित्य येथे आणले जाते. रसायनाचे रिकामे ड्रम, बारदाने, लोखंडी पत्रे व अन्य साहित्य आणून याठिकाणी ठेवले जाते. याच ठिकाणी जमविलेल्या भंगाराची विक्रीही केली जाते. सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणतीही खबरदारी न घेता हे गोडावून सुरू होते.
सोमवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास अचानक भंगाराच्या गोडावूला आग लागली. काही रसायनयुक्त व प्लास्टिक ड्रममुळे ही आग क्षणाक्षणाला भडकत होती. आगीने रौद्ररूप धारण करताच नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाला माहिती देण्यात आली. तसेच लोटे औद्योगिक वसाहतीचा बंबही मागविण्यात आला होता. त्यानंतर तब्बल अर्धा तास पाण्याचा मारा करूनही आग आटोक्यात येत नव्हती. एकाच वेळी दोन्ही बंबाने पाण्याचा मारा केल्यानंतर हळूहळू ही आग नियंत्रणात आली. या घटनेची माहिती व पंचनामा उशिरापर्यंत सुरू होता.
आगीचे लोट पसरल्याने वणवा लागला
भंगाराच्या गोडावूनच्या पलीकडील जागेत आगीचे लोट पसरल्याने वणवा लागला होता. त्याची झळ नव्याने उभारण्यात येत असलेल्या इमारतींनाही बसली. या घटनेमुळे गुहागर बायपास 3 रस्त्यावर काही काळ वाहतूक थांबली होती. आगीची तीव्रता कमी होताच वाहतूक पूर्ववत झाली.