( चिपळूण )
येथील गोविंदराव निकम कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये २७ मार्च रोजी डिप्लोमा व डिग्री फार्मसीच्या विद्यार्थ्यांसाठी कॅम्पस प्लेसमेंट मुलाखतींचे आयोजन करण्यात आले होते. या प्लेसमेंट ड्राइव्हमध्ये औषधनिर्माण क्षेत्रातील नामांकित कंपन्यांनी सहभाग नोंदवून विद्यार्थ्यांसाठी रोजगाराच्या उत्तम संधी उपलब्ध करून दिल्या.
या उपक्रमात मार्कसन्स फार्मास्युटिकल्स लिमिटेड आणि अजिओ फार्मास्युटिकल्स लिमिटेड या कंपन्यांचा सहभाग होता. मार्कसन्स फार्मास्युटिकल्स लिमिटेडमार्फत डी.फार्मा पात्र विद्यार्थ्यांसाठी ट्रेनी प्रॉडक्शन एक्झिक्युटिव्ह व क्वालिटी अॅश्युरन्स या पदांसाठी भरती प्रक्रिया पार पडली. तसेच अजिओ फार्मास्युटिकल्स लिमिटेडमार्फत बी.फार्मा आणि डी.फार्मा विद्यार्थ्यांसाठी ट्रेनी प्रॉडक्शन एक्झिक्युटिव्ह, क्वालिटी अॅश्युरन्स तसेच एमओ, लिक्विड व इंजेक्शन विभागांसाठी मुलाखती घेण्यात आल्या.
या प्लेसमेंट प्रक्रियेत मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. कंपन्यांच्या प्रतिनिधींनी विद्यार्थ्यांची गुणवत्ता, कौशल्य आणि उद्योगक्षमता यांचे परीक्षण केले. अशा प्रकारच्या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना औषधनिर्माण उद्योगात करिअरची योग्य दिशा मिळण्यास मदत होत असल्याचे महाविद्यालय प्रशासनाने सांगितले.
या प्लेसमेंट उपक्रमामुळे महाविद्यालयात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून भविष्यातही अशा रोजगाराभिमुख संधी उपलब्ध करून देण्याचा मानस प्रशासनाने व्यक्त केला.

