(रत्नागिरी / प्रतिनिधी)
गडनरळ चौकेवाडी येथील रस्त्यावरील वळणावर खड्डा चुकविताना महिंद्रा बोलेरोवरील चालकाचा ताबा सुटल्याने वाहन रस्त्याच्या बाजूला जाऊन पलटी झाल्याची घटना २८ मे रोजी दुपारी घडली. या अपघातात वाहनातील प्रदीप पुनाजी वाघोदे (५७) आणि प्रेमचंद दयानंद ओझा हे दोघे गंभीर जखमी झाले. या प्रकरणी बोलेरोचालक लिलाधर आत्माराम खाडे (रा. जयगड, सडेवाडी) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लिलाधर खाडे हा महिंद्रा बोलेरो (एमएच ०८ एएन ९०८२) घेऊन गडनरळ येथून जयगडच्या दिशेने जात होता. वाहनामध्ये प्रदीप वाघोदे, प्रेमचंद ओझा तसेच अनिल दधिच हे प्रवास करीत होते. गडनरळ चौकेवाडी येथील रस्त्याच्या वळणावर वाहन आले असता रस्त्यावरील खड्डा चुकविण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी रस्त्याची परिस्थिती लक्षात न आल्याने चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. वाहन रस्त्याच्या उजव्या बाजूला जाऊ लागल्यानंतर चालकाने स्टेअरिंग दुसऱ्या बाजूला वळविल्याने बोलेरो जागीच पलटी झाल्याचे पोलिस नोंदीत म्हटले आहे.
या अपघातात प्रदीप वाघोदे आणि प्रेमचंद ओझा यांना गंभीर दुखापत झाली, तसेच बोलेरोचे नुकसान झाले. याप्रकरणी जखमी प्रदीप वाघोदे यांच्या फिर्यादीवरून चालक लिलाधर खाडे याच्याविरोधात भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ मधील कलम २८१ आणि १२५(ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघाताचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.


