(पंढरपूर)
चंद्रभागेच्या तीरावर ‘विठ्ठल-विठ्ठल’चा जयघोष, लाखो भाविकांचा महासागर, अन् भक्तिभावाने ओतप्रोत भरलेला पंढरपूरचा आषाढी एकादशी सोहळा आज उत्साहात पार पडला. या पवित्र दिवशी पहाटे २.३० वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा पार पडली. यंदा सलग सहाव्यांदा मुख्यमंत्र्यांनी विठ्ठलाचे पूजन करण्याचा मान मिळवला. या पूजेसाठी त्यांच्यासोबत पत्नी अमृता फडणवीस आणि मुलगी दिव्यजा उपस्थित होत्या.
यंदाच्या शासकीय महापूजेचा मान नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील जातेगाव येथील कैलास दामू उगले (वय ५२) व त्यांच्या पत्नी कल्पना कैलास उगले (वय ४८) यांना मिळाला. विठ्ठलभक्तीत रमलेल्या या शेतकरी दांपत्याने मुख्यमंत्री आणि त्यांच्या पत्नीच्या साक्षीने महापूजेत सहभाग घेतला.
उगले दांपत्याची कथा ही श्रद्धेचा, निष्ठेचा आणि भक्तिभावाचा जिवंत पुरावा आहे. गेल्या १२ वर्षांपासून आषाढी वारीत सातत्याने सहभागी होणाऱ्या या वारकरी दांपत्याने आपल्या भक्तीने समाजात वेगळं स्थान निर्माण केलं आहे. कैलास उगले हे माजी सैनिकांचे पुत्र असून स्वतः शेतकरी आहेत. साध्या जीवनशैलीत राहणारे, पण विठ्ठलसेवेत अखंड तल्लीन असणारे हे दांपत्य आज लाखो भक्तांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
महापूजेचा मान मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त करताना उगले दांपत्य म्हणाले, “हा आमच्यासाठी स्वप्नवत क्षण आहे. शब्दात सांगता न येणारा आनंद मिळाला. दरवर्षी वारीला यायचं, पण यंदा विठ्ठलाच्या चरणी प्रत्यक्ष पूजेसाठी स्थान मिळणं, हे आम्हाला माऊलीकडून मिळालेलं सर्वात मोठं प्रसादच!” आता त्यांना संपूर्ण वर्षभरासाठी एसटीने मोफत प्रवासाची सुविधा मिळणार असून त्यांनी दर महिन्याला पंढरपूर वारी करण्याचा संकल्प केला आहे.
शासकीय महापूजेत मुख्यमंत्र्यांसोबत वारकरी प्रतिनिधी म्हणून सहभागी होणे हे केवळ धार्मिक नव्हे, तर सामाजिकदृष्ट्याही मोठे व्रत मानले जाते. ग्रामीण भागातील सामान्य शेतकरीसुद्धा आपल्या निष्ठेच्या जोरावर राज्यपातळीवर गौरव प्राप्त करू शकतो, हे उगले दांपत्याने सिद्ध केले आहे.
“पंढरपूरची वारी ही प्रत्येक वारकऱ्याच्या हृदयात अढळ स्थान मिळवून आहेच; मात्र उगले कुटुंबासाठी यंदाची वारी अधिक खास ठरली. कारण श्रद्धा, निष्ठा आणि भक्तिभावाच्या बळावर मिळालेला विठ्ठल चरणीचा सन्मान हे त्यांच्या आयुष्यातील सर्वोच्च आणि अविस्मरणीय गौरव बनून राहिला.”

