(रत्नागिरी / प्रतिनिधी)
लांजा येथील भाकरसेवा संस्थेच्या ३२व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित सोहळ्यात यावर्षीचा प्रतिष्ठेचा ‘अरुणा पुरस्कार’ समाजसेविका मानसी कांबळे यांना प्रदान करण्यात आला. तसेच समाजकार्यात निष्ठा व योगदान देणाऱ्या शंभर कार्यकर्त्यांचा ‘भाकर मित्र पुरस्कार’ देऊन संस्थेच्या वतीने गौरव करण्यात आला.
या सोहळ्याला जिल्हा माहिती व संपर्क अधिकारी प्रशांत सातपुते, समाजकल्याण सहाय्यक आयुक्त दीपक घाटे, डॉ. रत्ना जोशी, समाजसेवक युयुत्सू आर्ते, तसेच महात्मा फुले समाजसेवा मंडळाचे अध्यक्ष प्रमोद झिंझाडे आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमात बोलताना सहाय्यक आयुक्त दीपक घाटे यांनी भाकरसेवा संस्थेच्या तीन दशकांच्या कार्यप्रवासाचे कौतुक करत, संस्थेने समाजात आपली वेगळी ओळख निर्माण केली असून, सेवा व समाजप्रबोधन यांचा संगम साधला आहे, असे गौरवोद्गार काढले.
जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, आजच्या समाजात उच्चशिक्षित व्यक्ती पालकांना वृद्धाश्रमात पाठवतात; परंतु शेतकरी मुलगा आपल्या पालकांना कधीच वृद्धाश्रमात पाठवत नाही. ही वास्तवातील शोकांतिका आहे.
कार्यक्रमात युयुत्सू आर्ते यांनी संस्थेच्या सुरुवातीच्या वाटचालीच्या आठवणींना उजाळा देत, नव्या सामाजिक प्रकल्पांसाठी मार्गदर्शन केले. संस्थेचे संस्थापक देवेंद्र पाटील यांनी संस्थेचा प्रवास आणि कार्याचा आढावा सादर केला, तर अश्विनी मोरे यांनी संस्थेच्या ३२ वर्षांच्या सेवाप्रवासाचे वर्णन केले. या प्रसंगी संस्थेच्या अध्यक्ष मंगल पोवार, सचिव अश्विनी मोरे, खजिनदार प्रतीक्षा सोलीम, संचालक पवनकुमार मोरे, कमलताई लोकुरे आदी मान्यवर उपस्थित होते.
भाकर मित्र पुरस्कार प्राप्त सन्मान
सामाजिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या ज्यांचा ‘भाकर मित्र पुरस्काराने’ गौरव करण्यात आला, त्यात रिहाना जमादार, रामकृष्ण कीर, सचिन शिंदे, जमीर खलपे, कपिलानंद कांबळे, साक्षी गुरव, गौतम गमरे, सिद्धार्थ कांबळे, नीता कदम, पल्लवी परब, अविनाश जाधव, मयूर भितळे, राम चिंचाळे, ज्योती घडशी, राजू बनसोडे, रामेश्वर म्हेत्रे, प्रशांत बोरकर, श्रीदत्त गिरीसागर, वैभवकुमार शिंदे, अवधूत सुर्वे, तसलीम खोपेकर, ताराचंद पुजारी, संतोष पाथरे, आदेश कदम, दर्शना आग्रे, सोनिया सरतापे, पारस पोवार, श्रेयस घाटगे, श्रीधर पाटील, प्रतीक घाटगे, भालचंद्र लाड, चंद्रकांत वाडकर आदींचा समावेश आहे. तसेच धनज्योती महिला प्रभाग संघ (नाचणे) व जिव्हाळा संस्था (खेडशी) या संस्थांचाही गौरव करण्यात आला.

