बदलत्या जीवनशैलीमुळे अलिकडच्या काळात हृदयविकाराच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अस्वस्थ आहार, धूम्रपान, वाढते वजन, झोपेचा अभाव यामुळे तरुण वयोगटातही हृदयविकाराचे प्रमाण चिंताजनक झाले आहे. पूर्वी हा आजार प्रामुख्याने वृद्धांमध्ये दिसायचा, पण आता २० वर्षांच्या तरूणांनाही हृदयविकाराचा झटका येत आहे.
रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण होणे, चरबी जमा होणे आणि रक्तप्रवाह कमी होणे हे हार्ट अटॅकची प्रमुख कारणे आहेत. बऱ्याच जणांचा गैरसमज असतो की हृदयविकाराचा झटका अचानक येतो. मात्र, आरोग्यतज्ज्ञांच्या मते हार्ट अटॅक येण्यापूर्वी किमान ३० दिवस शरीर काही चेतावणी संकेत देत असते. या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यामुळे धोका वाढतो. योग्य वेळी खबरदारी घेतल्यास मोठा अपाय टाळता येऊ शकतो. हार्ट अटॅक तेव्हा येतो, जेव्हा हृदयाच्या स्नायूंना जाणारा रक्तप्रवाह अचानक थांबतो किंवा लक्षणीयरीत्या कमी होतो. हा अडथळा मुख्यत्वे करून धमनीमध्ये साचलेल्या चरबी, कोलेस्ट्रॉल आणि कॅल्शियमच्या थरांमुळे निर्माण होतो. हे थर हळूहळू कडक होत जाऊन रक्तवाहिन्या अरुंद करतात. परिणामी रक्तप्रवाहात अडथळा निर्माण होतो आणि हृदयाच्या स्नायूंना पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही. अशा स्थितीत हृदयाच्या काही भागाचे नुकसान होऊन हार्ट अटॅक होतो.
जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) माहितीनुसार दरवर्षी जगभरात सुमारे १.८ कोटी लोकांचा मृत्यू हृदयविकारांमुळे होतो. त्यात मोठा भाग हार्ट अटॅकमुळे होतो. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, जर रुग्णांना “गोल्डन अवर” म्हणजेच पहिल्या एका तासात योग्य उपचार मिळाले, तर हजारो लोकांचे प्राण वाचू शकतात.
हार्ट अटॅकची सुरुवातीची लक्षणे
-
छातीत, खांद्यात किंवा जबड्यात वेदना – छातीभोवती दाब, जडपणा किंवा वेदना जाणवणे हे महत्त्वाचे लक्षण आहे. हात, खांदे किंवा जबड्यातही वेदना होऊ शकतात. याकडे गॅस किंवा आम्लता समजून दुर्लक्ष करू नये. अनेकदा लोक याला हार्टबर्न समजतात, पण वेदना खांदा, गळा, जबडा आणि हातांपर्यंतही पसरू शकते. हे तेव्हा होते, जेव्हा हृदयाला पुरेसे ऑक्सिजनयुक्त रक्त मिळत नाही आणि धमन्या अरुंद होतात. ही वेदना कधी विश्रांतीत, कधी मेहनत किंवा ताणातही होऊ शकते.
-
अशक्तपणा आणि थकवा – कोणतेही परिश्रम न करताही थकवा जाणवणे हे प्रारंभिक लक्षण असू शकते. जेव्हा हृदय योग्य पद्धतीने रक्त पंप करू शकत नाही आणि शरीरातील अवयव आणि स्नायूंना पुरेसे ऑक्सिजन पोहोचत नाही, तेव्हा असा त्रास जाणवतो.
-
चक्कर येणे आणि बेशुद्ध पडणे – रक्ताभिसरण कमी झाल्यामुळे डोके गरगरणे, श्वास घेण्यास त्रास होणे ही धोकादायक लक्षणे आहेत. जेव्हा हृदयाचे रक्त पंप करण्याचे सामर्थ्य कमी होते, तेव्हा शरीर आणि मेंदूकडे पुरेसे ऑक्सिजन पोहोचत नाही. यामुळे रुग्णाला वारंवार चक्कर येणे, हलकं वाटणे किंवा डोकेदुखी/भोवळ यांसारख्या समस्या होऊ शकतात.
-
जास्त घाम येणे आणि छातीत जडपणा – कपाळावर सतत घाम येणे आणि श्वास घेण्यात अडचण होणे हे गंभीर संकेत आहेत.
-
हृदयाचे ठोके अनियमित होणे – काही सेकंदांसाठी ठोके वरखाली होणे हीसुद्धा हार्ट अटॅकची सूचना असू शकते. हृदयाचा ठोका खूप वेगवान, खूप मंद किंवा अनियमित होणेही हार्ट अटॅक होण्यापूर्वीचे लक्षण असू शकते.
-
व्यायाम करताना छातीत दुखणे – योगासन किंवा व्यायाम करताना छातीत वेदना जाणवल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
-
श्वास घेण्यास त्रास – साध्या कामांनंतरही दम लागणे किंवा पायऱ्या चढताना श्वास रोखल्यासारखा होणे हे हृदयावर वाढलेल्या दाबाचे लक्षण असू शकते. चालणे किंवा जिन्यावर चढणे अशा थोड्याशा हालचालींमध्ये जर श्वास फुलायला लागला, तर हे हृदयाच्या समस्या दर्शवू शकते. जेव्हा हृदय कमजोर होते, तेव्हा फुफ्फुसांमध्ये द्रव साचतो, ज्यामुळे श्वास घेणे कठीण होते.
हृदयविकार हा आता प्रत्येक वयोगटातील लोकांवर परिणाम करणारा आजार ठरत आहे. शरीर देत असलेल्या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता वेळीच वैद्यकीय सल्ला घेतल्यास जीव वाचवता येतो. हार्ट अटॅक अचानक येत नाही, शरीर आधीच सूचना देत असते—त्या वेळीच सावध व्हा!

