(मुंबई)
महापालिका निवडणुकीची रणधुमाळी संपताच राज्य सरकारने शुक्रवारी चार वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले. या निर्णयानुसार गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदी मनीषा पाटणकर-म्हैसकर यांची नियुक्ती करण्यात आली असून, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदी मिलिंद म्हैसकर यांची नेमणूक करण्यात आली आहे.
ज्येष्ठ सनदी अधिकारी आय. एस. चहल हे नियत वयोमानानुसार रविवारी सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्या सेवानिवृत्तीमुळे रिक्त होणाऱ्या गृह विभागाची जबाबदारी मनीषा पाटणकर-म्हैसकर यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. यापूर्वी चंद्रा अय्यंगार आणि निला सत्यनारायण या महिला अधिकाऱ्यांनी गृह खात्याची धुरा सांभाळली होती.
गृह विभागात नियुक्ती होण्यापूर्वी पाटणकर-म्हैसकर या सार्वजनिक बांधकाम विभागात अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून कार्यरत होत्या. त्यांच्या जागी वन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर यांची बदली करण्यात आली आहे.
याच आदेशानुसार महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक बुवेनेसवरी एस. यांची माहिती तंत्रज्ञान विभागाच्या संचालकपदी बदली करण्यात आली आहे. तसेच एच. एस. वसेकर यांची नियुक्ती संचालक, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्था (SCERT), पुणे या पदावर करण्यात आली आहे.
महापालिका निवडणुकांनंतर झालेले हे प्रशासकीय फेरबदल महत्त्वाचे मानले जात असून, राज्यातील प्रशासनिक यंत्रणेवर त्याचा थेट परिणाम होणार आहे.

