(गणपतीपुळे / वैभव पवार)
माघ शुद्ध प्रतिपदा ते माघ शुद्ध सप्तमी या कालावधीमध्ये श्रींचे स्वयंभू लंबोदर मंदिरामध्ये – संस्थान श्रीदेव गणपतीपुळे येथे माघी गणेशोत्सव प्रतिवर्षी साजरा होतो. यावर्षी शके १९४७ मध्ये, म्हणजेच 19 जानेवारी 2026 ते 25 जानेवारी 2026 ह्या दरम्यान हा उत्सव साजरा होत आहे.
सोमवार दिनांक 19 रोजी, श्रींच्या महापूजेने ह्या उत्सवाला प्रारंभ झाला. महापूजेला मुख्य पुजारी श्री. विनायक वासुदेव घनवटकर , श्री. ओंकार विनायक घनवटकर, डॉ. चैतन्य वासंती वामन घनवटकर, अभिजीत विनायक घनवटकर, दत्तराज घनवटकर आणि ग्रामस्थ ब्रह्मवृंद उपस्थित होते. आरती – प्रसादाचा लाभ अनेक गणेशभक्तांनी घेतला. त्यानंतर संध्याकाळी 4 ते 7 वेळेत गणेशयाग देवता स्थापना कार्यक्रम पार पडला.
आज मंगळवार दिनांक 20 रोजी सकाळी 7 ते 12 ह्या वेळेत गणेशयाग पूर्णाहूती होईल. उत्सव कालावधीमध्ये दिनांक 19 ते 23 रोजी, संध्याकाळी 7.30 ते 9.30 ह्या वेळेत ह. भ. प. श्रीपाद उपाख्य विनोद बुवा खोंड (रा. उमरेड, नागपूर) यांचे सुश्राव्य कीर्तन होणार आहे.
बुधवार, दिनांक 21 रोजी सकाळी 11 ते 12 ह्या वेळेत मोदक सहस्त्रनाम समर्पण होईल. गुरुवार दिनांक 22 रोजी श्रींची पालखी मिरवणून प्रदक्षिणा सायंकाळी 4 ते 6 ह्या वेळेत होईल. रथसप्तमी, दिनांक 25 रोजी, दुपारी 11.30 ते 02 ह्या वेळेत श्रींच्या महाप्रसादाचे आयोजन केले आहे
त्याशिवाय, शनिवार दिनांक 24 रोजी, संध्याकाळी 7.30 वाजता “नमिला गणपती” हा भावगीते, नाट्यगीते, भक्तिगीतांचा कार्यक्रम होणार आहे.(गायक : श्री अभिषेक काळे, गायिका : सौ. संपदा माने) तसेच रविवार दिनांक 25 रोजी, रात्रौ 10 वाजता , श्रीनिवास भणगे लिखित “शांतेचं कार्ट चालू आहे” हे धमाल विनोदी नाटक , श्री गणेश प्रासादिक नाट्यमंडळ यांच्यातर्फे सादर होईल.
सर्व गणेशभक्तांनी कार्यक्रमांना अवश्य उपस्थित रहावे असे आवाहन पंचकमिटी , संस्थान श्रीदेव गणपतीपुळे तर्फे करण्यात आले आहे.

