( चिपळूण )
तालुक्यातील गाणे-खडपोली औद्योगिक वसाहतीत साफयिस्ट कंपनीच्या विरोधात सुरू असलेले बेमुदत उपोषण अखेर आमदार शेखर निकम यांच्या यशस्वी मध्यस्थीनंतर स्थगित करण्यात आले आहे. गेल्या चार दिवसांपासून २२१ कामगार कंपनीसमोर आंदोलन करत होते.
गेल्या महिन्यात कंपनीने कोणतीही पूर्वसूचना किंवा कारण न देता २२१ कामगारांना कामावरून कमी केले होते. या निर्णयामुळे कामगार आणि कंपनी व्यवस्थापन यांच्यात तीव्र वाद निर्माण झाला. अनेक चर्चेनंतर कंपनीने १६३ कामगारांना पुन्हा कामावर घेतले; मात्र उर्वरित ५८ कामगारांना संधी न दिल्याने सर्व २२१ कामगारांनी एकात्मतेने बेमुदत उपोषणाला सुरुवात केली होती.
या प्रकरणी सहाय्यक कामगार आयुक्त संदेश आयरे यांनी व्यवस्थापनाशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला; परंतु चर्चा निष्फळ ठरली. उलट न्यायालयात जाण्याचा सल्ला दिल्याने संतप्त कामगारांनी त्यांना आंदोलनस्थळ सोडण्यास सांगत तीव्र नाराजी व्यक्त केली. दरम्यान, उपोषणाचे वातावरण दिवसेंदिवस तणावपूर्ण होत गेले होते. उपोषणाला पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी उत्स्फूर्त पाठिंबा दिला. काही उपोषणकर्त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना कामथे उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपोषणादरम्यान पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात होता.
कामगारांच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) तालुकाध्यक्ष नितीन ठसाळे, अॅड. अमित कदम, स्वप्निल शिंदे व निलेश कदम यांनी आक्रमक भूमिका घेत कामगारांची भूमिका ठामपणे मांडली. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आमदार शेखर निकम यांनी मंगळवारी सायंकाळी कामगारांशी चर्चा केली. आचारसंहितेच्या कालावधीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन उर्वरित ५८ कामगारांचा प्रश्न मार्गी लावू, असे आश्वासन त्यांनी दिले. या आश्वासनानंतर कामगारांनी त्यांचे बेमुदत उपोषण स्थगित केले.

