(खेड)
7 व 8 फेब्रुवारी रोजी CTET परीक्षा असलेल्या शिक्षकांना निवडणूक कर्तव्यातून मुक्त करावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, शाखा खेडचे अध्यक्ष संतोष चव्हाण यांनी केली आहे. याबाबतचे लेखी निवेदन माननीय तहसीलदार यांना सादर करण्यात आले आहे.
मूळतः 5 फेब्रुवारी 2026 रोजी होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका पुढे ढकलून 7 फेब्रुवारी रोजी घेण्यात येत आहेत. मात्र 7 आणि 8 फेब्रुवारी रोजी अनेक शिक्षकांची CTET परीक्षा असल्याने या शिक्षकांना एकाच वेळी परीक्षा आणि निवडणूक ड्युटीचा सामना करावा लागत आहे. परिणामी अनेक शिक्षक CTET परीक्षेपासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
खेड तालुक्यातील जवळजवळ सर्व प्राथमिक व माध्यमिक शिक्षक निवडणूक कर्तव्यावर नियुक्त करण्यात आले आहेत. निवडणूक 5 फेब्रुवारीला असताना शिक्षक उपलब्ध होते. मात्र अचानक तारीख बदलल्याने ही अडचण निर्माण झाल्याचे संतोष चव्हाण यांनी स्पष्ट केले.
“ज्या शिक्षकांची 7 व 8 फेब्रुवारी रोजी CTET परीक्षा आहे, त्यांना त्या दिवशी निवडणूक प्रक्रियेतून मुक्त करण्यात यावे, जेणेकरून त्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही,” अशी मागणी त्यांनी तहसीलदारांकडे केली आहे.
यावेळी संघटनेचे सचिव धर्मपाल तांबे, प्रवक्ते शैलेश पराडकर, सल्लागार परशुराम पेवेकर आदी उपस्थित होते.

