(संगमेश्वर / एजाज पटेल)
संगमेश्वर तालुक्यातून जाणाऱ्या महामार्गावर सुरू असलेल्या रस्ते विकास कामांच्या परिसरात नियमबाह्य, जीर्ण आणि अपूर्ण सुविधांची वाहने खुलेआम धावत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या वाहनांमुळे महामार्गावरील नागरिकांची सुरक्षितता धोक्यात आली असून, परिवहन (RTO) विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
महामार्गावर धावणाऱ्या अनेक वाहनांना क्रमांक फलकच नसल्याचे दिसून येत आहे. काही वाहनांना फक्त पुढील किंवा फक्त मागील क्रमांक फलक आहे, तर काहींचे क्रमांक इतके अस्पष्ट आहेत की वाचणे अशक्य होते. याशिवाय दिशादर्शक दिवे, परावर्तक पट्टे, मुख्य हेडलाईट्स नसणे किंवा अत्यंत अंधुक असणे, असे गंभीर दोष अनेक वाहनांमध्ये आढळून येत आहेत. काही वाहने इतक्या मोडक्या अवस्थेत आहेत की ती रस्त्यावर धावणे म्हणजे थेट नागरिकांच्या जीवाशी खेळ ठरत आहे.
या सर्व नियमभंगाचे फोटो आणि व्हिडिओ सातत्याने समाजमाध्यमे आणि वृत्तपत्रांमधून समोर येत आहेत. नागरिकांनी यापूर्वीही संबंधित यंत्रणांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला, मात्र एवढे होऊनही परिवहन विभागाकडून कोणतीही ठोस आणि व्यापक कारवाई होताना दिसत नाही, हे विशेष.
दरम्यान, सध्या एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून, त्यामध्ये अतिवेगात धावणाऱ्या एका मोठ्या मालवाहतूक वाहनाला जागरूक नागरिकांनी थांबवून जाब विचारल्याचे दिसते. चौकशीत संबंधित परप्रांतीय चालकाकडे जड वाहन चालविण्याचा परवाना नसल्याचे उघड झाले. त्याच्याकडे केवळ हलक्या वाहनाचा परवाना असून तोही जवळ नसल्याचे त्याने मान्य केले. हे वाहन एका ठेकेदार कंपनीचे असल्याचे सांगत चालकाने कंपनीचे नावही उघडपणे घेतले आहे.
सदर वाहन अत्यंत दयनीय अवस्थेत असून, त्याची नोंदणी आणि फिटनेस प्रमाणपत्र कसे व केव्हा मंजूर झाले, असा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या वाहनांमध्ये एखादी किरकोळ त्रुटी आढळली तरी RTOकडून तात्काळ दंडात्मक कारवाई केली जाते. मात्र तळकांटे ते आरवली दरम्यान महामार्गावर रात्रंदिवस धावणाऱ्या ठेकेदारांच्या वाहनांवर कारवाई करण्यास परिवहन विभाग का कचरतो, असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.
काही दिवसांपूर्वी याच महामार्गावर एका मालवाहतूक वाहनावर RTOने केलेली कारवाई अपवादात्मक ठरली. दररोज नियम मोडणाऱ्या असंख्य वाहनांकडे सातत्याने दुर्लक्ष का केले जाते, याचे उत्तर परिवहन विभागाने द्यावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
परिवहन विभाग आता निद्रावस्थेतून बाहेर येऊन चालकांचे परवाने, वाहनांची नोंदणी, फिटनेस प्रमाणपत्रे आणि कायदेशीर पात्रता यांची सखोल तपासणी करून कठोर कारवाई करणार का, असा थेट सवाल उपस्थित होत आहे. वेळेत कारवाई न झाल्यास भविष्यात होणाऱ्या गंभीर अपघातांची जबाबदारी कोणाची, हा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे.

