(नाशिक / प्रतिनिधी)
हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्यात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या राजमाता जिजाऊ माँसाहेब यांची जन्मभूमी असलेल्या सिंदखेड राजा येथे उद्या मंगळवार दि.२० मे रोजी श्री स्वामी सेवामार्गातर्फे विश्व कल्याणासाठी भव्य राष्ट्रीय सत्संग सोहळा तथा महिला सक्षमीकरण मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
सेवामार्गाचे प्रमुख गुरुमाऊली श्री. आण्णासाहेब मोरे यांच्या पावन सान्निध्यात राजमाता जिजाऊ माँ साहेबांना वंदन करण्यासाठी हा भव्य दिव्य सोहळा होत आहे. यानिमित्ताने संपूर्ण दिवसभर समाजोपयोगी आणि लोकोपयोगी उपक्रम राबविले जाणार आहेत अशी माहिती गुरुपुत्र श्री आबासाहेब मोरे यांनी दिली. जागर स्त्री शक्तीचा.. गजर राष्ट्र भक्तीचा या भावनेतून महिला सक्षमीकरणावर सर्वार्थाने भर देण्यात आला आहे असे श्री मोरे यांनी नमूद केले.
रोजगार, कृषी आणि वधू-वर परिचय मेळावा..
सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या वेळेत सर्व जातीय , धर्मियांसाठी विनामूल्य वधू- वर नोंदणी आणि परिचय मेळावा कार्यक्रमस्थळी घेण्यात येईल. तरी उपवर मुला मुलींनी या मेळाव्याचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे स्वयंरोजगार विभागातर्फे ३ हजार पदांसाठी भव्य रोजगार मेळावा संपन्न होणार आहे. यामध्ये नावनोंदणी करणाऱ्या पात्र उमेदवारांना मोठमोठ्या कंपन्यांमध्ये नोकरीची सुवर्णसंधी प्राप्त होणार आहे. बेरोजगार युवक युवतींनी आवश्यक कागदपत्रांसह आपली नाव नोंदणी करावी असे सूचित करण्यात आले आहे. विषमुक्त सेंद्रिय शेतीच्या प्रोत्साहनासाठी कृषी मेळावा आणि प्रशिक्षण शिबिरही घेण्यात येणार आहे. समस्त माता- भगिनींना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी उद्योग प्रात्यक्षिक प्रशिक्षण दिले जाणार आहे. तरी बचत गट आणि महिलांनी या प्रात्यक्षिक प्रशिक्षणाचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
श्री दुर्गा सप्तशती पाठ वाचन...
जागतिक शांतता प्रस्थापित होऊन शत्रू राष्ट्रांपासून भारत मातेच्या संरक्षणार्थ दुपारी ३:३० वाजता श्री दुर्गा सप्तशती सामुदायिक पाठ वाचण्याची शक्तिशाली सेवा रुजू केली जाणार आहे. या सेवेत महिला, पुरुष सेवेकर्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन आई भगवतीच्या चरणी सेवा समर्पित करावयाची आहे.
परमपूज्य गुरुमाऊलींचे अमृततुल्य हितगुज..
परमपूज्य गुरुमाऊली श्री आण्णासाहेब मोरे सायंकाळी ५:३० वाजता समस्त सेवेकरी वर्गाला संबोधित करतील. त्यांच्या अमृततुल्य हितगुजानंतर कार्यक्रमाची सांगता होईल. गुरुपुत्र श्री आबासाहेब मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली विदर्भ सत्संग सोहळा समितीने मेळाव्याचे नियोजन केले आहे. विश्व कल्याण हेतू आणि महिला सक्षमीकरणासाठी हा सत्संग मेळावा होत असल्याने देश विदेशातून मोठ्या संख्येने महिला सेवेकरी उपस्थित राहतील असे आयोजकांच्या वतीने सांगण्यात आले.
ह्या महासत्संग सोहळ्यासाठी राजकीय सामाजिक अनेक मातब्बर उपस्थित राहणार आहेत. त्यामध्ये केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, केंद्रीय क्रीडामंत्री रक्षाताई खडसे तसेच महाराष्ट्रातील मंत्रिमंडळातील उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे, सामाजिक न्याय मंत्री, संजय शिरसाठ, महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे, मंत्री पंकजाताई मुंडे, विधानपरिषद उपसभापती नीलम गोऱ्हे, आमदार मनोज कायंदे आमदार चैनसुख संचेती आमदार संजयजी गायकवाड आमदार सिद्धार्थ खरात आमदार श्वेताताई महाले उद्धव ठाकरे शिवसेना प्रदेश प्रवक्त्या जयश्रीताई शेळके माजी आमदार संजय रायमुलकर माजी आमदार शशिकांत खेडेकर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हाध्यक्ष ऍड नाझेर काझी भाजपा जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे इ. उपस्थित राहणार आहेत.