(खेड)
मुंबई–गोवा महामार्गावरील अपघातप्रवण भोस्ते घाट परिसरात आज (29 जानेवारी) सायंकाळी सुमारे 5.50 वाजता भीषण अपघात झाला. लोटे येथून गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या आयशर टेम्पोने पुढे चाललेल्या कंटेनरला पाठीमागून जोरदार धडक दिली. या धडकेत आयशर टेम्पोचा चालक केबिनमध्ये अडकून गंभीर जखमी झाला.
अपघाताची तीव्रता इतकी होती की टेम्पोचा पुढील भाग पूर्णपणे चेंदामेंदा झाला होता. चालक केबिनमध्ये अडकून पडल्याने घटनास्थळी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
एसपी नितीन बगाटेंची तत्परता; घटनास्थळी धाव घेत केली मदत
अपघाताच्या वेळी रत्नागिरी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नितीन बगाटे हे याच मार्गावरून प्रवास करत होते. अपघात झाल्याचे लक्षात येताच त्यांनी तात्काळ आपली गाडी थांबवून स्वतः घटनास्थळी धाव घेतली. सहाय्यक पोलिस, खेड पोलीस, वाहतूक शाखेचे कर्मचारी तसेच उपस्थित प्रवाशांच्या मदतीने त्यांनी केबिनमध्ये अडकलेल्या चालकाला सुरक्षितपणे बाहेर काढले. त्यानंतर त्वरित रुग्णवाहिकेला पाचारण करून जखमीला उपचारासाठी हलवण्यात आले.
विनामूल्य रुग्णवाहिकेची तातडीची सेवा
भरणे नाका ब्रिजखाली उभी असलेली जगद्गुरु रामनंदाचार्य श्री नरेंद्राचार्य जी संस्थान नाणिजधाम यांची 24 तास अपघात मदतीसाठी कार्यरत असलेली विनामूल्य रुग्णवाहिका तत्काळ घटनास्थळी दाखल झाली. या रुग्णवाहिकेतून फैजाक जाकीर पिया (वय 24, राहणार गुजरात) यांना उपजिल्हा रुग्णालय कळंबणी येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले.
एसपी नितीन बगाटे यांनी दाखवलेल्या तत्काळ निर्णयक्षमता आणि माणुसकीपूर्ण भूमिकेमुळे जखमी चालकाला वेळेत वैद्यकीय उपचार मिळू शकले. त्यांच्या या मदतकार्याचे नागरिक, प्रवासी आणि पोलीस यंत्रणेकडून सर्वत्र कौतुक होत आहे.
भोस्ते घाट पुन्हा चर्चेत; वाहतूक सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
भोस्ते घाट परिसरात वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे पुन्हा एकदा मुंबई–गोवा महामार्गावरील वाहतूक सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या मार्गावर तातडीने सुरक्षात्मक उपाययोजना करण्याची मागणी वाहनचालक आणि स्थानिक नागरिकांकडून होत आहे.

