(जाकादेवी / वार्ताहर)
७७ व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून मालगुंड एज्युकेशन सोसायटीच्या जाकादेवी येथील तात्यासाहेब मुळ्ये माध्यमिक विद्यालय व बाबाराम पर्शराम कदम कनिष्ठ महाविद्यालयात देशभक्ती भित्तीपत्रकाचे उद्घाटन मालगुंड एज्युकेशन सोसायटीचे संचालक व जाकादेवी विद्यालयाचे सी.ई.ओ.किशोर पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
प्रारंभी प्रजासत्ताक दिनी संस्थेचे संचालक किशोर पाटील यांच्या हस्ते ध्वज फडकवण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय गीते गाऊन क्रांतिकारकांचा जयघोष केला.शालेय विद्यार्थी व स्काऊट गाईड विद्यार्थ्यांची सुंदर संचलन केले. त्यानंतर सामुहिक कवायत,मानवी मनोरे, लेझीम नृत्य, तंबाखू मुक्त उपक्रमाच्या निमित्ताने घेण्यात आलेल्या स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांचा गौरव शिक्षक शिक्षण संस्थेचे चेअरमन सुनिल मयेकर, किशोर पाटील, मुख्याध्यापक, पर्यवेक्षक व मान्यवर यांच्या हस्ते करण्यात आला.
राष्ट्रीय दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांच्या लेखन साहित्यातून देशभक्ती भित्तिपत्रक साकारले आहे. या भित्तीपत्रकात शालेय विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर, क्रांतिकारक, प्रेरक गीते, क्रांतिकारक, राष्ट्रपुरुष यांचे जीवन कार्य, देशभक्तांचा जीवनप्रवास, राष्ट्रपुरुषांचे फोटो इत्यादी साहित्यांचा समावेश आहे. भित्तीपत्रकाच्या प्रमुख संपादकाची भूमिका सांस्कृतिक विभागाचे प्रमुख संतोष पवार यांनी पार पाडली.भित्तीपत्रकाच्या परिपूर्तीसाठी संतोष सनगरे, अरुण कांबळे, वैभव खानोलकर, केशव राठोड, किशोर नलवडे, संदेश सोनवडकर, सायली राजवाडकर, स्नेहल माने, निला कुराडे,मंदार रसाळ, हेमराज बहिरम, अजिंक्य साळवी, कलाध्यापक प्रणित जाधव, ज्युनिअर कॉलेजचा विद्यार्थी चित्रकार निर्मित दसम तसेच स्काऊट गाईड विद्यार्थ्यांचे उत्तम सहकार्य केले.
शाळेचे मुख्याध्यापक नितीन मोरे, पर्यवेक्षक शाम महाकाळ, संचालक किशोर पाटील, संस्थेचे चेअरमन सुनिल उर्फ बंधू मयेकर यांनी भित्तीपत्रकाच्या मौलिक कामगिरीबद्दल शिक्षक व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. भित्तीपत्रकाच्या उद्घाटन प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक नितीन मोरे पर्यवेक्षक शाम महाकाळ, शिक्षण संस्थेचे हितचिंतक प्रकाश कांबळे, माजी मुख्याध्यापक नामदेव वाघमारे, मालगुंड विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक हनुमंत कदम, शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष अर्जुन माचिवले, राजाराम पात्ये, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

