(संगमेश्वर / एजाज पटेल)
संगमेश्वर येथील सुप्रसिद्ध व अत्यंत सेवाभावी डॉक्टर प्रदीप खातू यांचा अंगणवाडी रामपेठ यांच्या वतीने श्री देव गणपती मंदिर येथील व्यासपीठावर आयोजित गौरव समारंभात सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला. पल्लवी शेरे व शीतल आंब्रे यांच्या शुभहस्ते हा सत्कार मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
गेली चार दशके रुग्णसेवेलाच ईश्वरसेवा मानून अविरत कार्य करणाऱ्या डॉक्टर खातू यांच्या कार्याची दखल म्हणून हा सन्मान करण्यात आला. संगमेश्वर तालुक्यासाठी हा गौरव अभिमानास्पद ठरला. सामाजिक जाणिवेच्या संस्कारातून घडलेले डॉक्टर खातू यांचे व्यक्तिमत्त्व असून त्यांचे वडील स्व. प्रभाकर खातू हे जिल्हा परिषद सदस्य म्हणून तसेच सामाजिक कार्यात सक्रिय होते.
डॉक्टर प्रदीप खातू व त्यांच्या पत्नी डॉ. प्रीती खातू यांनी वैद्यकीय सेवा कधीही केवळ व्यवसाय म्हणून न पाहता ती सेवाभावातून राबवली. रुग्णांची आर्थिक परिस्थिती न पाहता उपचार करणे, गरजू रुग्णांना मोफत औषधोपचार देणे, तसेच अॅडमिट रुग्णांसाठी जेवणाची व्यवस्था करणे, असे उपक्रम त्यांनी सातत्याने राबवले.
संगमेश्वर बाजारपेठेतील ‘सुश्रुषा’ दवाखाना हा सेवाभावाचे प्रतीक मानला जातो. विशेषतः महिला प्रसूती सेवेसाठी हा दवाखाना तालुक्यात विश्वासाचे केंद्र ठरला आहे. आपल्या सेवाकाळात डॉक्टर खातू यांनी शेकडो सुरक्षित प्रसूती यशस्वीपणे पार पाडल्या असून, जुळी व त्रिजुळी बाळांची दुर्मिळ प्रसूतीही त्यांनी यशस्वीरीत्या केली आहे.
पूर्वी आरोग्य सुविधा मर्यादित असतानाही रात्री-अपरात्री, पावसाळ्यात आणि प्रतिकूल परिस्थितीत रुग्णांच्या हाकेला तत्काळ प्रतिसाद देत घरोघरी जाऊन उपचार करण्याची त्यांची परंपरा आजही नागरिकांच्या स्मरणात आहे.
कोरोना महामारीच्या काळात डॉक्टर खातू कुटुंबीयांनी दाखवलेले धैर्य आणि सामाजिक बांधिलकी विशेष उल्लेखनीय ठरली. डॉक्टर प्रदीप खातू, डॉ. प्रीती खातू यांच्यासह मुलगा डॉ. प्रसाद खातू, मुलगी डॉ. श्रिया खातू व सून डॉ. सुनेत्रा खातू यांनी कोरोना रुग्णांवर उपचार करत सेवाभाव जपला.
हे सेवाभावी संस्कार पुढील पिढीतही जपले जात असून चिपळूण येथे ‘सुश्रुषा’ दवाखान्याच्या माध्यमातून ही परंपरा पुढे सुरू आहे. डॉक्टर खातू यांचा झालेला हा सत्कार म्हणजे केवळ एका व्यक्तीचा नव्हे, तर सेवाभाव, माणुसकी आणि वैद्यकीय नैतिकतेचा सन्मान असल्याची भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.

