(संगमेश्वर / दिनेश अंब्रे)
तळेकांटे (ता. संगमेश्वर) येथील आंब्याच्या बागेत असलेल्या घराचे कुलूप तोडून तीन पाण्याचे पंप चोरणाऱ्या दोन चोरट्यांना संगमेश्वर पोलिसांनी गजाआड केले आहे. या कारवाईत चोरीस गेलेले दोन पंप आणि गुन्ह्यात वापरलेले वाहन असा एकूण ६० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
शांताराम जयराम पाटोळे (वय ८०, रा. तळे-चटकवाडी, ता. संगमेश्वर, सध्या विरार, जि. पालघर) यांच्या तळेकांटे येथील आंब्याच्या बागेत असलेल्या घराशेजारील बंद गोडावून फोडून पंप चोरीस गेल्याची घटना घडली होती. ०६ सप्टेंबर ते १९ सप्टेंबर २०२५ या कालावधीत ही चोरी झाल्याचे निष्पन्न झाले. पाटोळे यांनी २६ सप्टेंबर रोजी संगमेश्वर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यावरून गुन्हा रजि. नं. १११/२०२५, भा. दं. सं. ३०५(अ), ३३१(३), ३३१(४), ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
तपासादरम्यान २७ सप्टेंबर रोजी पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे तळेकांटे येथील मयुर संजय मांजरेकर (वय २५) आणि मयुर अनंत कांबळे (वय ३०, दोघे रा. तळेकांटे, बौद्धवाडी) यांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्याकडून चोरीस गेलेले दोन पंप व वापरलेले वाहन जप्त करण्यात आले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अपर पोलीस अधीक्षक बी.बी. महामुनी, उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश माईनकर यांच्या मार्गदर्शनाखाली, संगमेश्वर पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजाराम चव्हाण यांच्या सूचनेनुसार सपोफौ/२८१ गावीत, पोहेकॉ/७०७ कोलगे, पोहेकॉ/१२७३ मनवल, पोहेकॉ/९०१ बरगाले व पोकॉ/१२७ खरपे यांनी केली.

