(कोल्हापूर)
कोल्हापूर शहरात अमली पदार्थविरोधी मोहिमेत पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. राजाराम तलाव परिसरात सापळा रचून पोलिसांनी तब्बल 83 किलो गांजा जप्त केला असून, याप्रकरणी समीर पापा शेख (वय 34, रा. साईनगर, कात्रज, पुणे) याला अटक करण्यात आली आहे. आरोपीकडून सुमारे 20 लाख रुपयांचा गांजा आणि टेम्पोसह एकूण 25 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
टेम्पोत नायलॉनच्या पिशव्यांत लपवलेला गांजा
पोलीस उपनिरीक्षक सचिन चंदन यांना राजाराम तलाव गेटसमोर, सरनोबतवाडी ते शिवाजी विद्यापीठ रोडदरम्यान एका व्यक्तीकडून गांजाची विक्री होणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार 27 जानेवारी रोजी मध्यरात्री सुमारे 12 वाजता सापळा रचण्यात आला. दरम्यान, पोलिसांनी एक संशयास्पद टेम्पो अडवून झडती घेतली. टेम्पोत वेगवेगळ्या रंगांच्या नायलॉन पिशव्या आढळून आल्या. पोलिसांचा संशय बळावल्यानंतर या पिशव्या उघडून पाहिल्या असता, प्रत्येक पिशवीत चिकटपट्टीने गुंडाळलेली गांजाची पॅकेट्स सापडली.
40 पॅकेट, 83 किलो गांजा
झडतीदरम्यान एकूण 40 पॅकेट्समध्ये 83 किलो 145 ग्रॅम गांजा आढळून आला. या गांजाची बाजारभावानुसार किंमत 20 लाख 78 हजार 625 रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच सुमारे 5 लाख रुपयांचा टेम्पोही जप्त करण्यात आला आहे. समीर शेख याला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
गांजा कुणाचा? मालकाचा शोध सुरू
आरोपी शेखकडून ज्या व्यक्तीने गांजाच्या पिशव्या दिल्या, त्या संबंधिताचा मोबाईल क्रमांक पोलिसांना मिळाला आहे. मात्र त्या क्रमांकावर संपर्क साधला असता तो बंद असल्याचे निष्पन्न झाले. या आधारे गांजाच्या मूळ मालकाचा शोध घेण्याचे काम सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पुणे ते कर्नाटक असा मार्ग
पोलिसांच्या माहितीनुसार, समीर शेख याचा ट्रान्सपोर्ट व्यवसाय आहे. नायलॉन पिशव्यांत कोकोपीठ असल्याचे सांगून त्या कर्नाटकात पोहोचवण्याचे काम त्याला देण्यात आले होते. त्यामुळे आपण केवळ भाड्याने वाहतूक करत असल्याचा दावा आरोपीने केला आहे. मात्र प्राथमिक तपासात पुण्यातून कर्नाटकात गांजा विक्रीसाठी नेला जात असल्याचे स्पष्ट झाले आहे.
गांजा रॅकेट उघड करण्याचे आव्हान
या प्रकरणातून गांजाच्या वाहतुकीचे पुणे कनेक्शन उघड झाले असून, मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. आरोपी चालक हा केवळ वाहतूक करणारा दुवा असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे गांजाचा मुख्य पुरवठादार आणि संपूर्ण नेटवर्क उघड करण्यासाठी पोलिसांचे पथक लवकरच पुण्यात रवाना होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

