(छत्रपती संभाजीनगर / वृत्तसंस्था)
दिल्लीतील आंदोलनानंतर देशभर चर्चेत आलेल्या कॉकरोच जनता पार्टीच्या (CJP) पुढील वाटचालीबाबत आता मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. पक्षाच्या कोअर कमिटीची महत्त्वपूर्ण बैठक मंगळवारी, 5 ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजीनगरातील वाळूज येथे पक्षाचे प्रमुख अभिजीत दिपके यांच्या निवासस्थानी होणार आहे. आगामी आंदोलनांची दिशा, नवीन मुद्दे आणि पक्षाची पुढील भूमिका यावर या बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती आहे. या बैठकीत नेमका कोणता निर्णय घेतला जाणार, याकडे राजकीय आणि सामाजिक क्षेत्राचे लक्ष लागले आहे. बैठकीनंतर पक्षाच्या निर्णयांची अधिकृत माहिती माध्यमांना दिली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. अभिजीत दिपके यांनीही बैठकीला दुजोरा दिला आहे.
दिल्लीतील आंदोलनानंतर CJP मोठ्या चर्चेत
नीट पेपरफुटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न उपस्थित करत कॉकरोच जनता पार्टीचे प्रमुख अभिजीत दिपके यांनी केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. या मागणीसाठी विविध टप्प्यांवर आंदोलने करण्यात आली. त्यानंतर दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलन आणि आमरण उपोषण करण्यात आले. या आंदोलनामुळे कॉकरोच जनता पार्टीची समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात चर्चा झाली. आंदोलनाला सामाजिक कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रातील व्यक्तींनी पाठिंबा दिल्याचा दावा पक्षाकडून करण्यात आला. दिल्लीतील आंदोलनादरम्यान झालेल्या लाठीचार्जच्या घटनेनंतरही या आंदोलनाची चर्चा वाढली. विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर सुरू झालेल्या या आंदोलनामुळे CJP च्या पुढील राजकीय आणि सामाजिक भूमिकेबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
आता पुढे काय? 5 ऑगस्टच्या बैठकीत ठरणार दिशा
दिल्लीतील आंदोलनानंतर आता कॉकरोच जनता पार्टी पुढे कोणता मुद्दा हाती घेणार? नवीन आंदोलनाची घोषणा होणार का? पक्षाची भूमिका आणखी आक्रमक होणार की वेगळ्या विषयावर लक्ष केंद्रित केले जाणार? याबाबत उत्सुकता आहे. याच पार्श्वभूमीवर 5 ऑगस्ट रोजी वाळूज येथे CJP च्या कोअर कमिटीची बैठक होत आहे. या बैठकीला जवळपास 15 सदस्य उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे. आगामी आंदोलनांची दिशा, नवीन मुद्दे आणि पक्षाची पुढील रणनीती यावर बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.
बैठकीपूर्वी अभिजीत दिपकेंचे मौन
या बैठकीबाबत अभिजीत दिपके यांनी दुजोरा दिला असला तरी बैठकीत नेमके कोणते निर्णय घेतले जाणार, याबाबत त्यांनी बैठकीपूर्वी अधिक भाष्य करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे 5 ऑगस्टच्या बैठकीनंतर CJP कडून कोणती घोषणा केली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नवा आंदोलनाचा मुद्दा, सरकारविरोधातील भूमिका की पक्षाच्या पुढील विस्ताराचा निर्णय? याचे उत्तर बैठकीनंतरच स्पष्ट होणार आहे.

