(नवी दिल्ली)
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवारी, 28 जानेवारी रोजी सकाळी झालेल्या विमान अपघातात निधन झाले. मुंबईहून बारामतीकडे जात असताना लँडिंगच्या वेळी त्यांचे चार्टर्ड विमान शेतात कोसळले. अपघातानंतर काही क्षणांतच विमानाला भीषण आग लागली आणि अजित पवार यांच्यासह विमानातील पाचही प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
बारामती परिसरात दाट धुके असल्याने दृश्यमानता अत्यंत कमी होती. त्यामुळेच हा अपघात घडल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र या दुर्घटनेनंतर देशभरातून शोक व्यक्त होत असतानाच, विरोधकांकडून या विमान अपघाताच्या सखोल आणि निष्पक्ष चौकशीची मागणी जोर धरताना दिसत आहे.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी या अपघातावर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. “अजित पवार काही दिवसांत त्यांच्या जुन्या राजकीय गटात परतणार होते. त्याआधीच ही दुर्दैवी घटना घडली. देशात यामुळे सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. आधी अहमदाबादमधील अपघात, आता हा अपघात. नेते वेळेअभावी चार्टर्ड विमानाने प्रवास करतात, अशा परिस्थितीत त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी कोणाची?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच या अपघाताची सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी ममता बॅनर्जी यांनी केली.
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनीही चौकशीच्या मागणीला पाठिंबा दिला आहे. “ज्या पद्धतीने हा अपघात झाला, त्याची चौकशी आवश्यक आहे. राजकारणीच नव्हे तर कॉर्पोरेट क्षेत्रातील लोकही मोठ्या प्रमाणात विमानप्रवास करतात. याआधी अहमदाबादमध्ये मोठा अपघात झाला, आता छोट्या विमानाचा अपघात झाला आहे. हा अपघात नेमका कसा आणि का झाला, हे समोर आले पाहिजे,” असे खर्गे म्हणाले.
समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनीही या प्रकरणी निष्पक्ष चौकशीची मागणी केली आहे. “अजित पवार हे महाराष्ट्रातील महत्त्वाचे आणि लोकप्रिय नेते होते. आजचा समाज जागरूक आहे, लोक तंत्रज्ञान समजतात. त्यामुळे या विमान अपघातामागचे नेमके कारण काय, हे तपासातून स्पष्ट झाले पाहिजे,” असे त्यांनी म्हटले.
दरम्यान, अजित पवार यांच्या निधनामुळे महाराष्ट्रासह देशभरात शोककळा पसरली असून, त्यांच्या आकस्मिक निधनाने राजकीय क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. विमान अपघाताचे नेमके कारण काय, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

