(नवी दिल्ली / वृत्तसंस्था)
राष्ट्रवादी काँग्रेस (अप) पक्षाचे प्रमुख आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज, 28 जानेवारी रोजी सकाळी बारामती येथे झालेल्या भीषण विमान अपघातात निधन झाले. बारामती विमानतळावर लँडिंगदरम्यान हा अपघात झाला असून, अजित पवार यांच्यासह विमानातील सर्व पाच जणांचा जागीच मृत्यू झाला.
या दुर्घटनेनंतर अपघातग्रस्त विमान कंपनीवर प्रश्न उपस्थित केले जात असताना, संबंधित विमान कंपनीच्या मालकाची पहिली अधिकृत प्रतिक्रिया समोर आली आहे. अपघातग्रस्त विमान व्हीएसआर व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड (VSR Aviation) या कंपनीचे होते.
कंपनीचे संचालक विजय कुमार सिंह यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, “विमान उतरवण्याचा निर्णय पूर्णपणे वैमानिकाचा होता. सुरुवातीला रनवे 29 वर लँडिंगचा प्रयत्न करण्यात आला. मात्र काही अडचणी आल्याने नंतर रनवे 11 वर पुन्हा लँडिंगचा प्रयत्न करण्यात आला आणि त्याच वेळी हा दुर्दैवी अपघात घडला.”
ते पुढे म्हणाले, “विमानाची देखभाल अत्यंत नियमित आणि काटेकोरपणे करण्यात आली होती. आमच्या प्राथमिक माहितीनुसार विमानात कोणताही तांत्रिक बिघाड नव्हता. सध्या तरी कोणतीही यांत्रिक अडचण आढळलेली नाही.”
दृश्यतेबाबत बोलताना विजय कुमार सिंह यांनी सांगितले की, “प्राथमिक अंदाजानुसार वैमानिकाला रनवे स्पष्टपणे दिसत नव्हता. त्या वेळी दृश्यता कमी होती. आम्ही मृतांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी उभे आहोत. ही आमच्यासाठी अत्यंत वेदनादायक शोकांतिका आहे.”
कंपनीच्या 2023 मधील एका अन्य अपघाताचा उल्लेख करताना त्यांनी स्पष्ट केले की, “तो अपघात मुंबई विमानतळावर झाला होता. तेव्हा देखील पावसामुळे दृश्यता कमी होती आणि लँडिंगनंतर विमान रनवेवरून घसरले होते. मात्र ती घटना पूर्णपणे वेगळी होती.”
या अपघातात विमानाचे मुख्य वैमानिक कॅप्टन सुमित कपूर आणि को-पायलट कॅप्टन शांभवी पाठक यांचाही मृत्यू झाला. कॅप्टन सुमित कपूर यांना 16 हजारांहून अधिक उड्डाण तासांचा अनुभव होता, तर कॅप्टन शांभवी पाठक यांच्याकडे सुमारे 1500 तासांचा अनुभव होता. “दोघेही अत्यंत अनुभवी, कुशल आणि जबाबदार वैमानिक होते,” असे सिंह यांनी नमूद केले.
भावनिक प्रतिक्रिया देताना विजय कुमार सिंह म्हणाले, “कॅप्टन सुमित कपूर माझे खूप जवळचे मित्र होते, भावासारखे होते. त्यांचा मुलगाही आमच्याच कंपनीत पायलट आहे. कॅप्टन शांभवी पाठक मला मुलीसारख्या होत्या. दोघेही कामात उत्कृष्ट माणसे होती.”
दरम्यान, या भीषण विमान अपघाताबाबत नागरी विमान वाहतूक यंत्रणांकडून सखोल चौकशी सुरू असून, ब्लॅक बॉक्स आणि तांत्रिक तपासणीनंतरच अपघाताचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.

