(नवी दिल्ली)
भारतीय कायद्यात ‘प्रेमात दुरावा’ या संकल्पनेला थेट मान्यता नसली, तरी तृतीय व्यक्तीने जाणीवपूर्वक वैवाहिक नात्यात हस्तक्षेप केल्यास पत्नीला नुकसानभरपाई मागण्याचा अधिकार आहे, असा महत्वाचा निर्णय दिल्ली हायकोर्टाने दिला आहे.
या प्रकरणामध्ये शेली महाजन यांचा विवाह २०१२ मध्ये झाला. २०१८ मध्ये दाम्पत्याला जुळ्या मुलांचा जन्म झाला. २०२१ मध्ये भानुश्री नावाची महिला शेली महाजन यांच्या पतीच्या व्यवसायात सामील झाली. त्यानंतर तिचे पतीसोबत प्रेमसंबंध निर्माण झाले. पत्नीला याबाबत २०२३ मध्ये ठोस पुरावे मिळाल्यानंतर दाम्पत्यामध्ये तणाव वाढला. पत्नीने जाब विचारल्यावर पतीने उघडपणे भानुश्रीसोबत सार्वजनिक ठिकाणी उपस्थित राहून पत्नीला अपमानित करण्यास सुरुवात केली.
दरम्यान, एप्रिल २०२५ मध्ये पतीने कुटुंब न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला. यानंतर पत्नीने हायकोर्टात भानुश्रीविरुद्ध नागरी नुकसानभरपाईचा दावा दाखल केला.
भानुश्रीचा युक्तिवाद :
हा वाद वैवाहिक बंधातून निर्माण झाल्याने सुनावणीचा अधिकार फक्त फॅमिली कोर्टाला आहे. शिवाय, प्रौढांना स्वेच्छेने नातेसंबंध ठेवण्याचा अधिकार असून, पत्नीला तो रोखण्याचा अधिकार नाही. घटस्फोटाच्या खटल्यात आधीच व्यभिचाराचा मुद्दा उपस्थित झाल्याने हा दावा केवळ त्याला प्रत्युत्तर आहे.
पत्नी शेली महाजन यांचा दावा :
तिसऱ्या व्यक्तीच्या जाणीवपूर्वक हस्तक्षेपामुळे तिला पतीच्या प्रेमापासून वंचित व्हावे लागले. त्यामुळे दिवाणी कायद्यानुसार नुकसानभरपाई मागण्याचा हक्क तिला आहे.
हायकोर्टाचे निरीक्षण :
न्यायमूर्ती पुरुषेंद्र कुमार कौरव यांनी स्पष्ट केले की, भारतीय कायद्यात ‘प्रेमात दुरावा’ या संकल्पनेला थेट मान्यता नसली तरी तृतीय व्यक्तीने जाणीवपूर्वक वैवाहिक नात्यात हस्तक्षेप केल्यास दिवाणी नुकसानभरपाईचा दावा ग्राह्य ठरतो. फॅमिली कोर्टाचा अधिकार वैवाहिक विवादांपुरता मर्यादित आहे. घटस्फोटाचा खटला सुरू असला, तरी पत्नीला पतीसोबत संबंध ठेवणाऱ्या व्यक्तीविरुद्ध स्वतंत्र दिवाणी नुकसानभरपाईचा दावा करता येतो. पतीला वैयक्तिक स्वातंत्र्याचा अधिकार आहे; पण तृतीय व्यक्तीने जाणूनबुजून हस्तक्षेप केल्यास दिवाणी जबाबदारी निश्चित होते.

