(मुंबई)
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाबद्दल राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार नारायण राणे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. “माझे सहकारी मित्र अजितदादा पवार यांच्या निधनाची बातमी मन सुन्न करणारी आहे,” अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
नारायण राणे म्हणाले की, राजकारणातील दीर्घ प्रवासात मतभेद आणि संघर्ष येतच असतात, मात्र त्या सर्वांपलीकडे जाऊन अजित पवार हे निर्भीड, ठाम निर्णय घेणारे आणि कार्यक्षम नेतृत्वाचे प्रतीक होते. सत्तेच्या केंद्रस्थानी असूनही सामान्य माणसाच्या वेदनांशी नातं जपणारा आणि कठीण परिस्थितीतही मागे न हटणारा असा खंबीर नेता महाराष्ट्राने गमावला आहे, असे त्यांनी नमूद केले.
अजित पवार यांची कार्यशैली, स्पष्ट भूमिका आणि जबाबदारीची जाणीव पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल, असे सांगत राणे यांनी शब्दांपेक्षा कृतीवर विश्वास ठेवणारा, जबाबदारीपासून कधीही दूर न जाणारा आणि जनतेच्या प्रश्नांसाठी कायम सज्ज असणारा नेता म्हणून त्यांचा गौरव केला.
अजित पवार यांच्या निधनाने राज्याच्या सार्वजनिक आणि राजकीय जीवनात मोठी व वेदनादायक पोकळी निर्माण झाली असल्याची खंत व्यक्त करत, “या दुःखद प्रसंगी त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात मी सहभागी आहे. ईश्वर त्यांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो,” अशा शब्दांत खासदार नारायण राणे यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

