(चिपळूण)
शहरालगतच्या खेर्डी बाजारपेठेत सोमवारी मध्यरात्री दोन सदनिका फोडून चोरट्यांनी तब्बल ७ तोळे सोन्याचे दागिने आणि रोकड लंपास केली, अशी धक्कादायक घटना मंगळवारी उघडकीस आली. या चोरीची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झाली असून, पोलिस तपासात ५ जणांची टोळी या घरफोडीमागे असल्याचे स्पष्ट झाले आहे.
खेर्डी येथील एका इमारतीत मयूर खेतले यांच्या सदनिकेचा मुख्य दरवाजा उचकटून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. घरात कोणीही नसल्याचा फायदा घेत त्यांनी कपाटे फोडून ६ ते ७ तोळे सोन्याचे दागिने व सुमारे ७ हजार रुपयांची रोकड चोरी केली. याच इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील सावंत कुटुंबियांची सदनिका देखील चोरट्यांच्या निशाण्यावर आली असून, त्यांच्या घरातूनही रोख रक्कम चोरीस गेल्याचे समोर आले आहे.
सीसीटीव्ही फुटेजमुळे तपासास गती
घटनेची माहिती मिळताच चिपळूण पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये तोंडाला कपडा गुंडाळलेले ५ संशयित चोर दिसून आले, जे ओळख लपवण्याचा प्रयत्न करत होते. पोलिसांनी फुटेजच्या आधारे चोरट्यांचा माग काढण्याचे काम वेगाने सुरू केले आहे.
शहर हद्दीत आणि मुंबई–गोवा महामार्गावर मोठ्या प्रमाणात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आल्यानंतर चोरीच्या घटनांना काही प्रमाणात आळा बसला होता, मात्र आता पुन्हा चोरट्यांनी डोके वर काढल्याने नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. पोलिसांनी रात्रीच्या गस्तीत वाढ करण्याचे आदेश दिले असून, लवकरच संशयितांना अटक होईल, असा विश्वास व्यक्त केला आहे.

