(सिंधुदुर्ग)
राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आज संपल्यानंतर अंतिम लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता संपूर्ण राज्यात प्रचाराची रणधुमाळी सुरू होणार आहे. मात्र, त्याआधीच काही ठिकाणी मतदानाविना विजयाचा गुलाल उधळण्यात आला असून, कोकण विभाग त्यामध्ये प्रामुख्याने सिंधुदुर्ग जिल्हा आघाडीवर आहे.
सिंधुदुर्गात महायुतीचे २२ उमेदवार बिनविरोध
तळकोकणात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांआधीच महायुतीचे तब्बल २२ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. यामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत भाजपचे १९ तर शिंदे गटाच्या शिवसेनेचे २ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.
रायगडमध्येही महायुतीला शुभ संकेत
रायगड जिल्ह्यात महाड तालुक्यातून शिंदे शिवसेनेला चांगले संकेत मिळाले असून, काही ठिकाणी मतदानाआधीच विजय निश्चित झाला आहे. पंचायत समिती स्तरावरही अनेक उमेदवार बिनविरोध निवडून आल्याचे चित्र आहे.
आता थेट सत्ताधारी विरुद्ध विरोधक लढत
राज्यात १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुका होत असून, उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे अनेक ठिकाणी थेट सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये लढती रंगणार आहेत. काही भागांत महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये स्थानिक पातळीवर समेट झाला आहे, तर काही ठिकाणी स्वतंत्र आणि बंडखोर उमेदवारांमुळे चुरस वाढली आहे.
दरम्यान, अर्ज माघारीनंतर आता ग्रामीण भागात राजकीय हालचालींना वेग आला असून, प्रचाराचा जोर वाढणार आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत कोण बाजी मारणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

