(जाकादेवी / वार्ताहर)
रत्नागिरी तालुक्यातील वरवडे पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ, वरवडे संचलित माध्यमिक विद्यालय वरवडे भागशाळा व श्रीमती पार्वती शंकर बापट कनिष्ठ महाविद्यालय, वाटद–खंडाळा येथे दानशूर व्यक्तिमत्त्व श्रीकांत शंकर बापट यांच्या भरीव देणगीतून उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक विज्ञान प्रयोगशाळेचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले.
संस्थेचे मुख्य आश्रयदाते श्रीकांत शंकर बापट (चेअरमन व मॅनेजिंग डायरेक्टर, इंडिया अॅनालिटिकल इन्स्ट्रुमेंट्स प्रा. लि., ठाणे) यांनी दिलेल्या ४५ लाख ८६ हजार रुपयांच्या देणगीतून ही सुसज्ज विज्ञान प्रयोगशाळा पूर्णत्वास आली आहे. ग्रामीण विद्यार्थ्यांना आधुनिक शैक्षणिक सुविधा उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने ही प्रयोगशाळा उभारण्यात आली आहे.
उद्घाटन समारंभ श्रीकांत बापट यांचे ज्येष्ठ बंधू श्री. श्रीराम शंकर बापट गुरुजी यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. यावेळी बोलताना त्यांनी ग्रामीण भागात शिक्षण घेताना आलेल्या अडचणी व संघर्षांची भावनिक आठवण करून दिली. संस्थेच्या शाळेमुळे ग्रामीण विद्यार्थ्यांचा शिक्षणातील संघर्ष कसा कमी झाला, याचा उल्लेख करत त्यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले.
या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र विचारे, माजी अध्यक्ष श्री. सुभाषराव विचारे, सचिव श्री. समीर बोरकर, सहकार्यवाह श्री. संदीप सुर्वे, संचालक श्री. अनिकेत सुर्वे व श्री. तुषार चव्हाण, माजी संचालक, माजी मुख्याध्यापक, पंचक्रोशीतील पालकवर्ग, ग्रामस्थ तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री. प्रभाकर धोपट व सर्व शिक्षकांनी केले. सूत्रसंचलनही श्री. प्रभाकर धोपट यांनी प्रभावीपणे केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संस्थाचालक, विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे उपक्रमशील मुख्याध्यापक श्री. शिवाजी जगताप, पर्यवेक्षक श्री. आनंद पाटील, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले.
नवीन विज्ञान प्रयोगशाळेमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक प्रयोगाधारित शिक्षणाची संधी मिळणार असून त्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन अधिक विकसित होईल, असा विश्वास यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.

