(गुहागर / प्रतिनिधी)
तालुक्यातील वरवेली-शिंदेवाडी येथील एका २६ वर्षीय महिलेच्या नवजात बाळाचा गुहागर ग्रामीण रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी (१६ डिसेंबर) दुपारी घडली. या घटनेमागे रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणा कारणीभूत असल्याचा गंभीर आरोप नातेवाईकांनी केला असून, याप्रकरणी गुहागर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
चुलत सासरे संजय शंकर शिंदे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, संबंधित महिला नऊ महिन्यांची गरोदर होती. मंगळवारी पहाटे सुमारे चारच्या सुमारास तिच्या पोटात तीव्र वेदना सुरू झाल्या. पती दुबई येथे, तर सासरे गुजरातमध्ये कामानिमित्त असल्याने, संजय शिंदे यांनी तिला खासगी वाहनाने पहाटे साडेपाचच्या सुमारास गुहागर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. यावेळी कर्तव्यावर असलेल्या डॉक्टरांनी प्रसूती सुरळीत होईल, असे सांगितले. मात्र, काही तासांनंतर रुग्णाची प्रकृती पाहता तिला घोणसरे येथील खासगी रुग्णालयात हलविण्याबाबत विचारणा केली असता, चिपळूण तालुक्यातील कामथे येथील सरकारी रुग्णालयात नेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, दुपारी सुमारे एकच्या सुमारास प्रसूती झाली. मात्र, नवजात बालक मयत असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जाहीर केले. यामुळे कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. सुरुवातीला प्रसूती व्यवस्थित होईल, असे सांगितल्यानंतर बालकाचा मृत्यू कसा झाला, असा सवाल उपस्थित करत शिंदे यांनी केवळ वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळेच हा प्रकार घडल्याचा आरोप केला आहे. या घटनेनंतर गुहागर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, उपनिरीक्षक संदीप भोपळे पुढील तपास करीत आहेत. या घटनेमुळे ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय सेवांच्या गुणवत्तेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
संजय शिंदे यांनी दिलेल्या तक्रारीबाबत गुहागर ग्रामीण रुग्णालयात चौकशी करण्यात येणार आहे. सखोल चौकशी केल्यानंतर यामध्ये संबंधित दोषी आढळल्यास गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी माहिती गुहागर पोलिसांकडून देण्यात आली.

