(सातारा)
महाबळेश्वरमधील केट्स पॉइंट परिसरात हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. १८ वर्षांच्या तरुणाने तब्बल ४०० फूट खोल दरीत उडी मारून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. भगवतसिंह मदनसिंह सोळंकी (रा. ढेबेवाडी, ता. पाटण) असे मृत तरुणाचे नाव असून, तो सातारा जिल्ह्यातील ढेबेवाडी गावचा रहिवासी होता.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भगवतसिंह हा महाविद्यालयीन शिक्षण घेत होता. त्याने CET परीक्षेचा फॉर्म भरला नव्हता. याच कारणामुळे तो काही दिवसांपासून नैराश्यात असल्याचा संशय ढेबेवाडी पोलिसांनी व्यक्त केला आहे. मात्र, फॉर्म न भरण्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
मूळचे राजस्थानचे असलेले सोळंकी कुटुंब गेल्या सुमारे २० वर्षांपासून ढेबेवाडी येथे वास्तव्यास आहे. ढेबेवाडी बाजारपेठेत त्यांचा बेकरी आणि स्वीट्सचा व्यवसाय आहे. भगवतसिंह हा कुटुंबातील धाकटा मुलगा होता. त्याचा मोठा भाऊ डॉक्टर असून, भगवतसिंह शिक्षण घेत होता.
शुक्रवारी (२३ जानेवारी) भगवतसिंह कोणालाही काहीही न सांगता घरातून निघून गेला होता. त्यानंतर तो बेपत्ता झाल्याने कुटुंबीयांनी सर्वत्र शोधाशोध केली. मात्र, त्याचा काहीही थांगपत्ता लागला नाही. अखेर कुटुंबीयांनी ढेबेवाडी पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. त्यानंतर मिसिंगची माहिती सातारा जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना पाठवण्यात आली.
दरम्यान, त्याच्या मोबाईलचे लोकेशन महाबळेश्वरमधील केट्स पॉइंट परिसरात आढळून आले. त्यानुसार पाचगणी पोलिसांनी सह्याद्री ट्रेकर्स, महाबळेश्वर ट्रेकर्स आणि प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टीमला पाचारण केले. शोधमोहीमेदरम्यान केट्स पॉइंटवरील सुमारे ४०० फूट खोल दरीत उतरल्यावर तरुणाचा मृतदेह आढळून आला.
महाबळेश्वर ट्रेकर्स तसेच प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टीमने अथक प्रयत्न करून मृतदेह दरीतून वर काढला. त्यानंतर पाचगणी पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला. रुग्णालयात मृत तरुणाचे कुटुंबीय, ढेबेवाडी आणि पाचगणी पोलीस उपस्थित होते. मुलाचा मृतदेह पाहताच सोळंकी कुटुंबीयांचा आक्रोश उपस्थितांचे काळीज पिळवटून टाकणारा होता. शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण ढेबेवाडी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

