(नांदेड)
नांदेडमधील शिवाजीनगर पोलीस ठाण्यातून दोन आरोपींनी पोलिसांच्या ताब्यातून पळ काढल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. मात्र पोलिसांनी वेगाने कारवाई करत काही तासांतच दोन्ही आरोपींना पुन्हा अटक करण्यात यश मिळवले आहे.
शिवाजीनगर पोलिसांनी एका गुन्ह्याच्या तपासासाठी तीन आरोपींना हस्तांतरण वॉरंटवर ताब्यात घेतले होते. रविवारी दिवसभर त्यांची चौकशी सुरू होती. सायंकाळच्या सुमारास पोलिसांची नजर चुकवत दोन आरोपींनी ठाण्यातील खिडकीतून उड्या मारून पळ काढला.
घटना लक्षात येताच पोलिसांनी तात्काळ शोधमोहीम सुरू केली. त्यापैकी एका आरोपीला विसावा गार्डन परिसरातून लगेचच ताब्यात घेण्यात आले. तर दुसरा फरार आरोपी सोहेल अब्दुल सत्तार (रा. जवाहरनगर, नांदेड) याला ५ मे रोजी दुपारी पिरबु-हान नगर परिसरातून अटक करण्यात आली.
या घटनेनंतर शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकासह सर्व पोलिस कर्मचाऱ्यांनी जलद हालचाली करत दोन्ही आरोपींना पुन्हा जेरबंद केल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, पोलिस ठाण्यातून आरोपी पळून जाण्याची घटना गांभीर्याने घेतली जात असून सुरक्षेतील त्रुटींचा तपास केला जात आहे.

