(नवी दिल्ली)
देशभरातील राष्ट्रीय महामार्गांवरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे. येत्या १ एप्रिल २०२६ पासून देशातील सर्व टोल प्लाझा पूर्णपणे कॅशलेश करण्यात येणार आहेत. यानंतर टोल भरण्यासाठी रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही. वाहनचालकांना केवळ FASTag किंवा UPI या डिजिटल पर्यायांद्वारेच टोल शुल्क भरावे लागणार आहे.
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, टोल नाक्यांवरील मानवी हस्तक्षेप कमी करणे, वाहतूक कोंडी टाळणे आणि प्रवास अधिक जलद व सुलभ करण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या टोल प्लाझांवर रोख रकमेकरिता खुली असलेली किमान एक ‘कॅश लेन’ १ एप्रिल २०२६ पासून कायमस्वरूपी बंद करण्यात येणार आहे.
मंत्रालयाच्या माहितीनुसार, वाहनावर वैध FASTag नसेल किंवा FASTag खात्यात पुरेशी शिल्लक नसेल, तर संबंधित वाहनचालकाला दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागेल. अशा परिस्थितीत टोल रकमेच्या १.२५ पट रक्कम UPI द्वारे भरावी लागणार आहे.
हा निर्णय भविष्यातील ‘बॅरियर-फ्री’ टोलिंग प्रणाली आणि GPS आधारित टोल वसुलीच्या दिशेने टाकलेले महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. या बदलामुळे टोल नाक्यांवरील प्रतीक्षा वेळ कमी होईल, इंधनाची बचत होईल आणि राष्ट्रीय महामार्गांवरील वाहतूक अधिक सुरळीत होण्यास मदत मिळणार असल्याचे केंद्र सरकारकडून सांगण्यात आले आहे.

