(ठाणे)
शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी रमेश तिखे यांचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांकडून वारंवार फोन आणि चौकशीसाठी दिलेल्या नोटिसींमुळे मानसिक तणाव वाढून तब्येत खालावल्याचा आरोप ठाकरे गटाने केला आहे.
कल्याण डोंबिवली महापालिकेतील ठाकरे गटाचे नगरसेवक मधुर म्हात्रे आणि कीर्ती ढोणे हे बेपत्ता असल्याची तक्रार कोळसेवाडी पोलीस ठाण्यात देण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी शहरात बेपत्ता नगरसेवकांचे पोस्टर लावले होते. या पोस्टर मोहिमेत रमेश तिखे यांचा देखील सहभाग होता.
पोस्टरमुळे बदनामी झाल्याचा आरोप करत मधुर म्हात्रे यांचे नातेवाईक दिव्येश म्हात्रे यांनी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी पोस्टर लावणाऱ्या ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना नोटिसा बजावत चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले.
ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांचा आरोप आहे की, पोलिसांकडून सतत चौकशीसाठी बोलावणे आणि फोनचा तगादा लावण्यात आला. या मानसिक दबावामुळे रमेश तिखे यांची प्रकृती अचानक खालावली. त्यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असतानाच आज पहाटे सुमारे अडीच वाजता त्यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला.
रमेश तिखे हे कल्याण पूर्वेतील करपेवाडी परिसरात राहत होते. पोलिसांच्या दबावामुळेच त्यांचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख शरद पाटील यांनी केला आहे. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात येत आहे.

