(रत्नागिरी)
जगाच्या पाठीवर भारत एकमात्र असा देश आहे ज्या देशात भाषा, संस्कृती यासारख्या बाबतीत विविधता आहे त्यामुळे भारत देश हा नाविन्यपूर्ण आहे. संस्कृत आणि संस्कृती यांचा मिलाफ असणाऱ्या भारतीय ज्ञान परंपरेतून विकसित भारत साकारूया असे प्रतिपादन रत्नागिरी संस्कृत उपकेंद्राचे संचालक डॉ दिनकर मराठे यांनी केले.
ते कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे भारतरत्न डॉ पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्र रत्नागिरी उपकेंद्र येथे प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
यावेळी डॉ दिनकर मराठे म्हणाले की, भारतात विविध संस्कृतींची एक विशेषता आहे. अशीच सर्व संस्कृतींचे मिश्रण असणारी संस्कृतनिष्ठ भारतीय ज्ञान परंपरा भारताला विकसित करण्यात महत्त्वाचे योगदान देणारी आहे. त्यामुळे विकसित भारतासाठी आपण सर्वांनी संघटित प्रयत्न करू असे ते म्हणाले.
या कार्यक्रमाच्यावेळी एम ए योगशास्त्र विषयाचे भारत सावंत व सिद्धी कोळेकर या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत सादर केले. यावेळी रत्नागिरी संस्कृत उपकेंद्रातील विद्यार्थी प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वरूप काणे यांनी केले.

