(गणपतीपुळे / वैभव पवार)
जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या गणपतीपुळे मंदिर येथे यंदाच्या उन्हाळी पर्यटन हंगामात मंगळवार, दिनांक ५ मे रोजी अंगारकी चतुर्थी यात्रोत्सवाचा योग जुळून आल्याने भाविक आणि पर्यटकांची प्रचंड गर्दी उसळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर संस्थान श्री देव गणपतीपुळे, ग्रामपंचायत, पोलीस प्रशासन आणि इतर सर्व यंत्रणांनी व्यापक आणि सुयोग्य नियोजन केले आहे.
या दिवशी स्वयंभू श्रींच्या दर्शनासाठी मंदिर पहाटे साडेतीन वाजता खुले करण्यात येणार आहे. मुख्य पुजाऱ्यांच्या हस्ते पूजा, मंत्रपुष्प आणि आरती झाल्यानंतर भाविकांना दर्शनासाठी प्रवेश दिला जाईल. भाविकांची संभाव्य मोठी गर्दी लक्षात घेता दर्शन व्यवस्था अधिक सुलभ व्हावी यासाठी मंदिर परिसरात सुबक आणि नियोजित रांगांची व्यवस्था करण्यात आली आहे.
दर्शन रांगांमध्ये भाविकांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी पिण्याच्या पाण्याची सोय, उन्हापासून संरक्षणासाठी शेड, तसेच सुरक्षेसाठी देवस्थानचे रक्षक, स्वयंसेवक आणि पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे रत्नागिरीतील श्री अनिरुद्ध बापू उपासना ट्रस्टचे स्वयंसेवकही या सेवेत सहभागी होणार आहेत.
गर्दी नियंत्रणासाठी रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाकडून सुमारे १५० पोलीस कर्मचारी तैनात करण्यात येणार असून १७ वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण बंदोबस्त उभारण्यात येणार आहे. वाहतूक व्यवस्थापन, पार्किंग आणि सुरक्षा यावर विशेष भर देण्यात आला आहे.
या यात्रोत्सवाच्या नियोजनासाठी काही दिवसांपूर्वी तालुका प्रशासनाच्या वतीने प्रांताधिकारी जीवन देसाई यांच्या अध्यक्षतेखाली तसेच जयगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय पाटील यांच्या उपस्थितीत विशेष बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत सर्व विभागांमध्ये समन्वय साधून भाविकांना कोणतीही गैरसोय होणार नाही, याची दक्षता घेण्याचे ठरवण्यात आले.
कोल्हापूर, सांगली, सातारा, इचलकरंजी, कराड, मिरज, कवठेमहांकाळ या घाटमाथ्यावरील भागांतून मोठ्या संख्येने भाविक गणपतीपुळेकडे येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. यंदा उन्हाळी पर्यटन हंगाम आणि अंगारकी चतुर्थी एकत्र आल्याने राज्यासह देशभरातून पर्यटकांची लक्षणीय उपस्थिती अपेक्षित आहे.
समुद्रकिनाऱ्यावर कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी पोलीस गस्त वाढवण्यात आली असून ग्रामपंचायतीमार्फत सहा जीवरक्षक तैनात करण्यात आले आहेत. तसेच आरोग्याच्या दृष्टीने तातडीच्या उपचारासाठी देवस्थानची रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात येणार आहे.
सायंकाळी भव्य पालखी मिरवणूक
अंगारकी चतुर्थी निमित्त सायंकाळी साडेचार वाजता स्वयंभू श्रींची भव्य पालखी मिरवणूक मंदिराच्या प्रदक्षिणा मार्गावरून काढण्यात येणार आहे. ढोल-ताशांचा गजर, फटाक्यांची आतषबाजी आणि “मंगलमूर्ती मोरया”च्या जयघोषात ही मिरवणूक पार पडणार असून यामध्ये देवस्थानचे पदाधिकारी, ग्रामस्थ, पोलीस कर्मचारी, भाविक आणि पर्यटक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.
एकूणच, या यात्रोत्सवासाठी सर्व यंत्रणा सज्ज असून सुमारे ६० ते ७० हजारांहून अधिक भाविक स्वयंभू श्रींच्या दर्शनासाठी उपस्थित राहतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. याचबरोबर यात्रेच्या निमित्ताने विविध व्यापारीही येथे दाखल झाल्याने भाविकांना खरेदीचा आनंदही लुटता येणार आहे.

