( गुहागर )
तालुक्यातील उमराठ गावात ३ ऑगस्टला बिबट्याचे १ महिन्याचे छोटे पिल्लू सापडले होते. दोन दिवस वनरक्षकांनी हे पिल्लू शोधण्यासाठी त्याची आई येईल म्हणून गावात देखरेख ठेवली. पिल्लाचे संगोपन केले. त्याची आई येत नाही हे निश्चित झाल्यावर वनविभागाने या पिल्लाची रवानगी बोरिवली येथील राष्ट्रीय उद्यानात केली आहे. मात्र या प्रकाराला २८ दिवस झाल्यानंतर आता हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने या प्रकरणात स्थानिक शिक्षकांना नाहक मनस्ताप होत आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, ३ ऑगस्ट च्या मुसळधार पावसात रात्री वाट चुकलेले बिबट्याचे एक पिल्लू उमराठ बौद्धवाडीतील प्रशांत कदम यांच्या घराजवळ ओरडत असताना त्यांना दिसले. हे पिल्लू पावसात भिजल्याने गारठले होते. प्रशांत कदम आणि वाडीतील मंडळी त्या रात्री या पिल्लावर लक्ष ठेवून होते. त्याची आई त्याला घेऊन जाईल अशी आशा त्यांना होती. मात्र त्या रात्री बिबट्याचे पिल्लू न्यायला त्याची आई आली नाही. रविवारी ४ ऑगस्टला या बिबट्याच्या पिल्लाला ग्रामस्थांनी आसरा दिला, दूध पाजले, त्याचे संगोपन केले. त्या रात्री देखील त्याची आई त्याला न्यायला येईल अशी अपेक्षा होती, परंतु त्याची आई आली नाही. सोमवारी सकाळ पर्यंत या पिल्लाची काळजी बौद्धवाडीतील ग्रामस्थांनी घेतली, त्यामुळे हे पिल्लू माणसाळले होते. एका निराधार पिल्लाला बौद्धवाडीतील ग्रामस्थांनी जीवनदान दिले. अवघ्या एक महिन्याच्या या पिल्लाचे संगोपन होणे गरजेचे असल्याने ग्रामपंचायत उमराठचे सरपंच जनार्दन आंबेकर यांनी वन विभागाला या पिल्लाबाबतची माहिती दिली.
वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी येण्यापूर्वी येथील काही ग्रामस्थांनी कुतूहल म्हणून तसेच अतिशय दुर्मिळ असणारे बिबट्याचे पिल्लू कसे दिसते हे जवळून पाहता यावे यासाठी जवळच्याच जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना दाखविण्यासाठी बास्केट मधून नेले. शिक्षकांना या विषयी कल्पना नव्हती. बास्केट मधून नेलेले बिबट्याचे पिल्लू शाळेच्या वरांड्यात ठेवण्यात आले. शिक्षकांना व मुलांना सांगत असताना हे पिल्लू बास्केट मधून बाहेर आले. त्यावेळी दोन दिवस ज्यांच्या घरी या पिल्लाचे संगोपन करण्यात आले त्याच घरातील शाळेत असणाऱ्या मुलाने हे पिल्लू उचलून घेतले. यावेळी येथे उपस्थित असणाऱ्यांपैकी कोणीतरी याचे फोटो काढले, व्हिडिओ केले होते.
सदरील पिल्लू हे बिबट्याचे असल्याने येथील शिक्षकांनी हे इथून घेऊन जा, व वन विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगा, अशा प्रकारे ग्रामस्थांना सल्ला दिला. शाळेतून घरी आल्यानंतर अगोदरच वन विभागाला याची कल्पना दिली असल्याने वन विभागाने येऊन हे पिल्लू घेऊन शृंगारतळीला नेले. त्यानंतर आणखी दोन रात्री वन विभागाचे अधिकारी पिल्लाला घेऊन उमराठ मध्ये आले. पिल्लाच्या शोधात असलेली मादी त्याला न्यायला येईल अशी त्यांना अपेक्षा होती, त्यामुळे आजूबाजूच्या परिसरात तीन लाईट व्हिजनचे कॅमेरे वन विभागाने लावले होते. परंतु बुधवार रात्री पर्यंत पिल्लाला न्यायला त्याची आई आलीच नाही. अखेर गुरुवारी ८ ऑगस्टला वन विभागाने हे पिल्लू मुंबई येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरिवली यांच्या ताब्यात देण्याचा निर्णय घेऊन सुरक्षित रवाना करण्यात आले.
दरम्यान शाळेमध्ये कोणीतरी काढलेले फोटो व व्हिडिओ आता जवळजवळ २८ दिवसानंतर व्हायरल झाले. या नंतर सदरील वस्तुस्थिती लक्षात न घेता यामध्ये काहीही दोष नसलेल्या शिक्षकांना टार्गेट केले जात आहे. तरी सदरील विषयाची परिपूर्ण माहिती न घेता अशा प्रकारे शिक्षकांना टार्गेट करण्यात येऊ नये, असे आवाहन ग्रामपंचायत उमराठचे सरपंच जनार्दन आंबेकर आणि स्थानिक ग्रामस्थांनी केले आहे.

