( संगमेश्वर / प्रतिनिधी )
सलग सुट्यांमुळे शनिवारी सकाळपासूनच संगमेश्वर येथील महामार्गावर वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने वाहतूक कोंडीची परिस्थिती निर्माण झाली. संगमेश्वर एसटी स्टँडसमोर तसेच तेथून मुंबई आणि गोवा दिशेने सुमारे १ ते १.५ कि. मी. पर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. त्यामुळे अनेक वाहनचालक व प्रवासी अक्षरशः अडकून पडले होते. गेले दोन दिवस वाहतूक कोंडीमुळे वाहनचालक, प्रवासी आणि पादचारी त्रस्त झाले आहेत.
दिवसभर चौकात पोलीस तसेच होमगार्ड तैनात होते व त्यांनी वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी प्रयत्न केले. मात्र शनिवारी संध्याकाळी उशीरा चौकात पोलीस व होमगार्ड उपस्थित नसल्याने चारही बाजूंनी वाहतूक पूर्णतः ठप्प झाली होती. एसटी बससह अवजड व खासगी वाहने रांगेत अडकून पडली होती.अशा गंभीर परिस्थितीत आंबेड गावचे पोलीस पाटील सुरेश रहाटे यांनी स्वतः पुढाकार घेत थेट वाहतूक कोंडीत प्रवेश केला. त्यांनी वाहनचालकांना योग्य मार्गदर्शन करून शिस्तबद्ध पद्धतीने वाहतूक सुरळीत करण्याचे काम हाती घेतले. त्यांच्या या तत्परतेमुळे काही वेळातच वाहतूक कोंडी सुटली आणि वाहनचालकांना दिलासा मिळाला.
या वेळी अनेक वाहनचालक व प्रवाशांनी पोलीस पाटील रहाटे यांच्या कार्याबद्दल समाधान व्यक्त करत त्यांचे मनापासून आभार मानले. कोणतीही जबाबदारी नसताना सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी दाखवलेली तत्परता निश्चितच अभिमानास्पद आहे.
संगमेश्वर — मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गावरील सोनवी पुलादरम्यान महामार्ग चौपदरीकरणाचे काम सुरू असताना वाहतुकीच्या नियोजनाचा अभाव असल्याने वाहनचालकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. सोनवी पुलाजवळ दोन्ही बाजूंनी सलग दोन दिवस वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून, या कोंडीचा थेट फटका संगमेश्वर बाजारपेठेला बसत आहे. सकाळच्या वेळेत मालवाहतूक व प्रवासी वाहतूक खोळंबल्याने व्यापारी, स्थानिक नागरिक आणि प्रवाशांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.वाहतूक कोंडी नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना मोठी कसरत करावी लागत असून, अपुऱ्या मनुष्यबळात वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, योग्य नियोजन आणि पर्यायी मार्गांची व्यवस्था नसल्याने समस्या वारंवार उद्भवत असल्याचे चित्र आहे. महामार्ग चौपदरीकरणाच्या कामादरम्यान ठोस वाहतूक व्यवस्थापन आराखडा तयार करून तातडीने अंमलबजावणी करावी, अशी मागणी वाहनचालक आणि स्थानिक नागरिकांकडून होत आहे.

