(कणकवली)
केंद्र सरकारच्या ‘प्रोजेक्ट वीर गाथा 5.0’ या प्रतिष्ठेच्या राष्ट्रीय शालेय उपक्रमात कणकवलीच्या कोकणकन्या सावी मुद्राळे हिने उल्लेखनीय यश संपादन केले आहे. देशभरातील सुमारे २ कोटी विद्यार्थ्यांमधून निवड झालेल्या केवळ १०० विजेत्यांपैकी पहिल्या १० क्रमांकांत सावीने आपले स्थान निश्चित केले आहे.
ही कामगिरी केवळ वैयक्तिक यश न राहता कोकणच्या संस्कारांची, मेहनतीची आणि जिद्दीची साक्ष ठरली आहे. सावीच्या या यशामुळे कोकणासह संपूर्ण महाराष्ट्राची मान अभिमानाने उंचावली आहे.
येत्या २६ जानेवारी २०२६ रोजी राजधानी दिल्ली येथे माननीय केंद्रीय संरक्षण मंत्री श्री. राजनाथ सिंह यांच्या हस्ते सावी मुद्राळे हिचा विशेष सत्कार होणार आहे. याचबरोबर तिला प्रजासत्ताक दिनाच्या ऐतिहासिक परेडसाठी लाल किल्ल्यावर ‘विशेष अतिथी’ म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे.
कोकणातील एका सर्वसाधारण कुटुंबातून दिल्लीच्या लाल किल्ल्यापर्यंत पोहोचलेला सावीचा हा प्रवास देशभरातील विद्यार्थ्यांसह विशेषतः मुलींसाठी प्रेरणादायी ठरणारा आहे.
सावी मुद्राळे हिच्या या दैदीप्यमान यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून तिच्या पुढील शैक्षणिक आणि वैयक्तिक वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या जात आहेत.

