(मुंबई)
संपत्तीच्या वादात रक्ताच्या नात्याला काळिमा फासणारी थरकाप उडवणारी घटना मुंबईच्या जुहू परिसरात उघडकीस आली आहे. संपत्तीच्या वादाने पेटलेल्या एका भावाने आपल्या सख्ख्या बहिणीची धारदार चाकूने हल्ला करून निर्घृण हत्या केली. हल्ल्यानंतर काही क्षणातच बहिणीचा देह रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडला.
अन्वया करंदीकर पैंजणकर (वय ४५) यांच्यावर त्यांच्या सख्ख्या भावाने, आशिष करंदीकर ( वय ५०) यांनी, शुक्रवारी (२५ एप्रिल) हा हल्ला केला. संपत्तीच्या वादातून उद्भवलेला वाद काही क्षणांतच हिंसक वळणावर गेला आणि चिडलेल्या भावाने किचनमधील धारदार चाकू उचलून एकामागून एक वार करत बहिणीचा जीव घेतला.
पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आरोपीस अटक केली असून, याप्रकरणी विविध गंभीर कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वडिलांच्या मृत्यूनंतर सुरू असलेल्या संपत्तीच्या वादाने अखेर एका बहिणीचे आयुष्य गमावले. दरम्यान वडिलांचे निधन झाल्यापासून आरोपी भाऊ आशिष आणि मयत बहीण अन्वया यांच्यात संपत्तीवरून वाद सुरू होता. यावरून दोघांमध्ये वारंवार भांडणे व्हायची. शुक्रवारी त्यांच्यात संपत्तीवरून झालेला वादच बहिणीच्या अखेर जीवावर बेतला.