(मंडणगड)
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त त्यांच्या जन्मगावी आंबडवे (ता. मंडणगड) येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र शासन (सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण कार्यालय रत्नागिरी) तसेच श्रीकृष्ण महिला बालकल्याण व अपंग पुनर्वसन विकास मंडळ, मातोश्री हॉस्पिटल मंडणगड यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर उत्साहात पार पडले.
या शिबिराचे उद्घाटन राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, तसेच गृहराज्यमंत्री व महसूल राज्यमंत्री योगेश कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. यावेळी सहाय्यक आयुक्त दीपक घाटे, संस्था प्रतिनिधी योगेश पाटील, जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिता केंद्रे, पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षीत यादव, समाजकल्याण सभापती सुयोग कांबळे, महिला व बालविकास सभापती मयुरी शिर्के, पंचायत समिती सभापती प्रणाली चिले, प्रांताधिकारी डॉ. विजयकुमार सूर्यवंशी, सरपंच दीपिका जाकल, तसेच इतर मान्यवर आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिबिराचे उद्घाटन करताना पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी “ज्येष्ठांचा सन्मान म्हणजे आपल्या संस्कृतीचा अभिमान” असे गौरवोद्गार काढले. संस्था प्रतिनिधी योगेश पाटील यांनी संस्थेच्या कार्याचा आणि या उपक्रमाचा सविस्तर आढावा घेतला.
या शिबिरात एकूण १८५ ज्येष्ठ नागरिकांनी आरोग्य तपासणी करून घेतली. मातोश्री हॉस्पिटल मंडणगड आणि प्राथमिक आरोग्य केंद्र मंडणगड येथील तज्ञ डॉक्टरांनी तपासणी केली. यामध्ये डॉ. प्रदीप मुळे, डॉ. अभिषेक गावंडे (तालुका आरोग्य अधिकारी), डॉ. शाम कंकाळ, डॉ. भावठाणकर, डॉ. आसिफ खान पठाण, डॉ. संजय पिलंकर, डॉ. मंदार रेगडे तसेच आरोग्य कर्मचारी यांनी सेवा दिली.
ज्येष्ठ नागरिकांना मोफत औषधे, ईसीजी तपासणी, आरोग्यविषयक मार्गदर्शन तसेच पुढील उपचार आणि शस्त्रक्रियेसंदर्भात सल्ला देण्यात आला. शिबिराबाबत उपस्थित ज्येष्ठ नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
हे शिबिर यशस्वी करण्यासाठी समाजसेवक शशिकांत चव्हाण यांनी विशेष परिश्रम घेतले. त्यांच्या कार्याचे मान्यवरांनी कौतुक केले. भविष्यातही अशा आरोग्य शिबिरांचे मोठ्या प्रमाणावर आयोजन करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

