(चिपळूण)
चिपळूण नगर परिषदेने लोकमान्य टिळक स्मारक वाचनालय व डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालयाच्या सहयोगाने वाचू आनंदाने हा उपक्रम सुरू केला आहे. रविवारी पेठमाप येथील विठ्ठल मंदिरात हा उपक्रम पार पडला. परिसरातील वाचकांनी याला प्रतिसाद दिला.
माजी उपनगराध्यक्ष बापू काणे व अन्य मान्यवरांच्या हस्ते विठ्ठलाला श्रीफळ अर्पण करण्यात आले. जवळपास दोन तास या ठिकाणी नागरिक वाचनात मग्न झाले होते. या वेळी माजी नगराध्यक्ष सावित्री होमकळस, माजी उपनगराध्यक्ष रतन पवार, माजी नगरसेविका स्वाती दांडेकर, इनायक मुकादम, माजी नगरसेवक रामशेठ रेडीज, माजी नगरसेविका गौरी रेळेकर, आंबेडकर वाचनालयाचे प्रदीप पवार, विलास महाडिक, कैसर देसाई, प्रा. विनायक होमकळस, सुनील खेडेकर, समीर कोवळे आदी उपस्थित होते.
पुढील रविवारी माजी नगरसेवक रामशेठ रेडिज यांच्या पुढाकाराने त्यांच्या धामणवणे येथील जंगलामध्ये “वाचू आनंदाने” हा उपक्रम पार पडणार आहे. सकाळी साडेसात वाजता रेडीज पेट्रोल पंप येथून वाचकांच्या जाण्याची व्यवस्था वाहनाच्या माध्यमातून केली जाणार आहे. पुस्तक वाचनाबरोबरच जंगल वाचनाचाही उपक्रम या ठिकाणी होणार असल्याचे प्राची जोशी यांनी सांगितले.