(रायगड)
पतन विभागांतर्गत करण्यात आलेल्या कामाचा गुणवत्ता अहवाल मिळवून देण्यासाठी लाचेची मागणी करून ती स्वीकारताना दोन खासगी महिलांना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, रायगडच्या पथकाने रंगेहात पकडले.
घटनेचा तपशील :
श्रेयस नंदकुमार म्हात्रे यांनी रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यात धाकटे शहापुर येथे खाडीलगत पक्क्या रॅम्प बांधण्याचे कंत्राट ३ एप्रिल २०२५ रोजी मिळवले होते. या कामासाठी तक्रारदार यांना उपठेकेदार म्हणून अधिकारपत्र देण्यात आले होते. काम सुरू झाल्यानंतर आवश्यक बांधकाम साहित्याची तपासणी करून त्याचा अहवाल माणगाव येथील दक्षता व गुणनियंत्रण जिल्हा प्रयोगशाळेतून घेणे बंधनकारक होते. यासाठी तक्रारदारांनी १८ हजार रुपये शासकीय शुल्क ऑनलाईन भरले होते.
यानंतर तक्रारदारांनी अहवाल मिळवण्यासाठी प्रयोगशाळा कार्यालयाशी संपर्क साधला असता, तेथे कार्यरत असलेल्या खासगी महिला सोनल संतोष नाडकर (वय २८, रा. कोशिबळे, ता. माणगाव) हिने शासकीय शुल्काव्यतिरिक्त स्वतःसाठी आणि ‘साहेबां’साठी अजून १८ हजार रुपयांची मागणी केली. याबाबत तक्रारदारांनी ४ सप्टेंबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, रायगड येथे तक्रार दाखल केली.
८ सप्टेंबर रोजी दुपारी पडताळणी कारवाईदरम्यान सोनल नाडकर व तिची साथीदार संजना सुरज धाडवे यांनी तक्रारदाराकडे १८ हजार रुपयांची लाच मागणी केली. चर्चेनंतर १५ हजार रुपये घेण्याचे ठरले. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने उप अधीक्षक सरिता भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचला.
कारवाईदरम्यान सोनल संतोष नाडकर हिने तक्रारदाराकडून १५ हजार रुपयांची लाच स्वीकारताच तिला रंगेहात पकडण्यात आले. या गुन्ह्यात संजना धाडवे हिनेही प्रोत्साहन दिल्याने तिलाही ताब्यात घेण्यात आले. दोघींविरोधात माणगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

